सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (एनसीबी) मुंबई युनिटने कोरेगाव तालुक्यातील बिचुकलेमध्ये नुकतीच एक कारवाई केली. मुंबईतील कारवाईनंतर कोरेगाव तालुक्यातील बिचुकले येथे अंमली पदार्थ विरोधी सेलच्या मुंबई शाखेच्या अधिकार्यांकडून काही संशायास्पद बाबींची तपासणी करण्यात आली. याबाबत एकनाथ शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. “मुंबईतील तब्बल २०० कोटी रूपयांच्या ड्रग्ज प्रकरणाचे धागेदोरे बिचुकले गावापर्यंत पोहचले आहेत. ही अत्यंत गंभीर बाब आहे. शहरी भागातील ड्रग्जचे लोण ग्रामीण भागात पोहचले आहे. हे चुकीचे असून या प्रकरणाची राज्य सरकारने मुळाशी जावून चौकशी करावी. तसेच यातील दोषींवर कडक कारवाई करावी आणि मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी अशा गोष्टी गांभीयनी घ्याव्यात, अशी मागणी आमदार शिंदे यांनी केली.
कोरेगाव तालुक्यातील निगडी रंगनाथ स्वामी येथे जयंत डांगरे यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना पक्षात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा प्रवेश करण्यात आला. यावेळी आमदार शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी आ. महेश शिंदे म्हणाले की, विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये हा विषय मी यापूर्वी उपस्थित केला होता. मात्र, त्यावर कार्यवाही झाली नाही. नवी मुंबई विशेष करून बाजार समिती परिसरात असे प्रकार घडत आहेत. कोरेगाव मतदार संघाचे नाव विकासाच्या संदर्भात पुढे जात आहे. असे असताना कोरेगाव तालुक्यातील बिचुकले गावातील संशयित व तोही एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी आहे ही बाब मतदारसंघ व माझ्यासाठी दुःखाची आहे.
वारंवार नवी मुंबईतील एपीएमसीच्या मार्केटमध्ये कधी १०० किलो, कधी २०० किलो असा कोट्यवधी रुपयांचा ड्रग्जचा साठा सापडत आहे. याचा गंभीरपणे विचार करायची गरज आहे. भाजीपाल्याच्या ट्रकमध्ये परदेशातून ड्रग्ज मागवले जात आहेत. यामध्ये पोलिस व प्रशासनाचाही सहभाग आहे. मात्र, याच्या मुळाशी पोलिस जाणीवपूर्वक जात नाहीत, असा आरोपही आ. शिंदे यांनी केला.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे महत्वाची मागणी
आ. महेश शिंदे पुढे म्हणाले, दोन वर्षांपूर्वी असाच ट्रक सापडल्यानंतर याबद्दल विधानसभेत प्रश्न मांडला होता. परंतु त्याच्यावर कसलीच कारवाई झाली नाही. वाईट एकाच गोष्टीचे वाटते की, ज्या मुंबई मेट्रो शहरांमध्ये जे होतंय, घडतेय ते आज ग्रामीण भागात सुरू झालेले आहे. अशा घटना घडतायेत याचीच आम्हाला लाज वाटते. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी अशा गोष्टी गांभीयनि घ्याव्यात, अशी मागणीही आ. महेश शिंदे यांनी केली.