सातारा प्रतिनिधी । सातारा शहर परिसरातील शरिराविरुध्दचे व मालमत्तेविरुध्दचे सराईतपणे गुन्हे करणाऱ्या अमीर मुजावर (वय २३, रा. पिरवाडी ता. सातारा) टोळी प्रमुखासह टोळीतील ४ जणांवर दोन वर्षाकरीता जिल्ह्यातून तडीपारीची कारवाई करण्यात आली. पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या आदेशानुसार सोमवारी संबंधितांवर कारवाई करण्यात आली.
अमीर सलीम शेख (वय २३, रा. वनवासवाडी, कृष्णानगर ता.जि. सातारा), अभिजीत ऊर्फ आबु राजु भिसे (वय २१, रा. सैदापुर, सातारा ता. सातारा), यश सुभाष साळुंखे (वय १९, रा. मोळाचा ओढा सातारा), अलिम नजीर शेख (वय १९, मोळाचा ओढा सातारा) अशी त्यांची नावे आहेत.
सातारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत खून करणे, दरोडा टाकणे, – खूनाचा प्रयत्न करणे, गंभीर दुखापत पोहोचवणे, बेकायदेशीर जमाव जमवून मारहाण करुन दुखापत करणे, बेकायदेशीर शस्त्राचा वापर करणे, शिवीगाळ दमदाटी करणे यासारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याने सातारा शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक आर. बी. मस्के यांनी या टोळीविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा फलम ५५ प्रमाणे संपुर्ण सातारा जिल्हयातून दोन वर्षे तडीपार करण्याबाबतचा प्रस्ताव तयार केला.
हा प्रस्ताव हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांच्याकडे सादर केलेला होता. या प्रस्तावाची चौकशी उपविभागीय पोलीस अधिकारी, सातारा विभाग साताराचे किरणकुमार सुर्यवंशी यांनी केली होती. या टोळीतील इसमावर दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये त्यांच्यावर वेळोवेळी अटक तसेच प्रतिबंधक कारवाई करुनही त्यांची गुन्हे करण्याच्या प्रवृत्तीत कोणताही बदल झाला नाही.
या टोळीमधील इसम हैं सातारा शहर तसेच परिसरामध्ये सातत्याने गुन्हे करीत होते. त्यांच्यावर कायद्याचा कोणताच धाक न राहिल्यामुळे सातारा शहर परिसरातील लोकांना मोठ्या प्रमाणावर या टोळीचा उपद्रव होत होता. अशा टोळीवर सर्वसामान्य जनतेमधुन कडक कारवाई करणेची मागणी होत होती. त्यानुसार टोळीला पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्यासमोर सुनावणी होवून या टोळीला सातारा जिल्हयातून दोन वर्षाकरीता हद्दपारीचा आदेश पारीत केला आहे.
याकामी हद्दपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाच्या वतीने अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, पोलीस हवालदार प्रमोद सावंत, अमित सपकाळ, पोलीस कॉन्स्टेबल केतन शिंदे, महिला पोलीस कॉन्स्टेबल अनुराधा सणस, सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोहवा दिपक इंगवले, संदीप पवार, पोलीस कॉन्स्टेबल अमोल सापते -यांनी योग्य पुरावा सादर केला आहे.