सातारा प्रतिनिधी । सातारा येथील राष्ट्रवादी काँग्रेस भवनामध्ये नुकतीच महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर देखील चर्चा करून काही निर्णय घेण्यात आले. महाविकास आघाडीचा कोणीही उमेदवार असला तरीही दि. २६ पासून विधानसभा मतदारसंघात एकत्रित प्रचार करण्याबाबत निर्णय घेण्यात आला.
सातारा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतून राष्ट्रवादीचा शरद पवार गट लढणार आहे. तर महायुतीत भाजप आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात तिडा आहे. महायुतीचा उमेदवार ठरत नाही तोपर्यंत शरद पवार हे देखील आपला उमेदवार जाहीर करणार नाहीत. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी मात्र एकत्रितपाने पुढील रणनीतीबाबत निर्णय घेत असल्याचे दिसून येत आहे.
इंडिया आघाडीतील पदाधिकारी २६ मार्चपासून सातारा लोकसभा मतदारसंघात बैठका घेणार आहेत. या बैठका विधानसभा मतदारसंघनिहाय असणार आहेत. यामध्ये दि. २६ रोजी पाटण आणि कराड येथे बैठक होणार आहे. तर दि. २७ मार्चला कोरेगाव, दि. २८ जावळी तालुक्यात मेढा येथे आणि साताऱ्यात बैठक पार पडणार आहे. दि. २९ मार्चला वाई, खंडाळा आणि महाबळेश्वरची बैठक घेतली जाणार आहे.
महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या सातारा जिल्ह्यात आतापर्यंत दोन बैठका झाल्या आहेत. त्या बैठकांमध्ये पहिली बैठक ही राष्ट्रवादी भवनमध्ये तर दुसरी गट महिन्यात काॅंग्रेस कमिटीच्या कार्यालयात झाली आहे. या बैठकीस जिल्ह्यातील महाविकास आघाडीतील माजी मुख्यमंत्री पृश्वीराज चव्हाण, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे यांच्यासह घटक पक्ष, संघटनांच्या प्रमुखांनी उपस्थिती लावली होती. आघाडीने उमेदवार कोणीही असो आम्ही एकसंध आहोत, असे या बैठकीतून सर्वांच्या वतीने सांगण्यात आले. याच पार्श्वभूमीवर साताऱ्यात नुकतीच राष्ट्रवादी भवनमध्ये आघाडीची बैठक पार पडली.
या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीत सातारा जिल्ह्याला दिवंगत यशवंतराव चव्हाण, देशभक्त किसन वीर आबा, बाळासाहेब देसाई यांच्या विचारांचा वारसा लाभला आहे. त्यामुळे या निवडणुकीत आघाडीचा उमेदवार कोणीही असला तरी देखील त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला. यासाठी एकत्रित बैठका, सभा घेण्याचे ठरविण्यात आले.
बैठकीला कोण-कोण उपस्थित होते?
राष्ट्रवादी भवनमधील या बैठकीला राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डाॅ. सुरेश जाधव, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सचिन मोहिते, राजेंद्र शेलार, राजकुमार पाटील, नरेश देसाई यांच्यासह इंडिया आघाडीतील ॲड. वर्षा देशपांडे, विजय मांडके, मकरंद बोडके, मिनाज सय्यद, ॲड. रवींद्र पवार, शरद जांभळे, स्वप्नील वाघमारे, प्राची ताकतोडे, काॅ. अस्लम तडसरकर आदी उपस्थित होते.