सातारा प्रतिनिधी | कास पठारावरून महाबळेश्वरकडे जाणारा जुना राजमार्ग खुला झाला तर महाबळेश्वर, पाचगणीतील पर्यटकदेखील कास पठाराला भेट देतील. पर्यटकांची संख्या वाढली तर आपसूकच या भागाचे चलन-वलनही वाढेल. पर्यटन वाढण्यास याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक निर्णय घ्यावा, असे खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रतिपादन केले.
जागतिक वारसा स्थळात समाविष्ट झालेल्या कास पठारावर फुलांचा हंगाम सुरू झाला असून, हे पठार रविवारपासून पर्यटकांसाठी खुले करण्यात आले. या हंगामाचा शुभारंभ केल्यानंतर खा. उदयनराजे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलिस अधीक्षक समीर शेख, माजी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, वनविभागाचे अधिकारी व कास वन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी खा. उदयनराजे म्हणाले की, हाताला काम नसल्याने कास पठार व परिसरातील अनेक भूमिपुत्रांना विस्थापित व्हावे लागले. ही परिस्थिती बदलून स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ‘कास’चा पर्यटनदृष्ट्या विकास साधला जाईल.
अलीकडच्या काही वर्षांत हा परिसर विकसित होऊ लागला आहे. पर्यटन वाढू लागले आहे. त्यामुळे पर्यटनाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. कास पठार व परिसर हा अत्यंत सुंदर आहे. याची जपणूक करणं, तो स्वच्छ ठेवणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. पर्यटकांनीदेखील सामाजिक जबाबदारीतून पठाराचे सौंदर्य अबाधित ठेवावे, असे आवाहन खा. उदयनराजे भोसले यांनी केले.