सातारा प्रतिनिधी । शरद पवारांचा कुठला करिष्मा आणि काय करिष्मा, त्यांचा कधी करिष्मा होता. लोकांपुढे पर्याय नव्हता म्हणून ते त्यांच्या नेतृत्वांना मानत होते. शरद पवार यांच्याकडे नेमकं काय ध्येय धोरण होते. तंगड्यात तंगड घालून पाडापाडी करायचे हेच त्यांचे राजकारण असायचे. त्या पलिकडे त्यांनी काय केले हे सांगावे, अशी जाहीरपणे घणाघाती टीका खासदार उदयनराजे यांनी शरद पवार यांच्यावर केली.
भाजपचे नवनिर्वाचित आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या जल्लोष मिरवणुकीदरम्यान भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी म्हणाले, महाविकास आघाडीकडे कधीही सकारात्मक दृष्टीकोन नव्हता. नकारात्मक दृष्टीकोनातून त्यांनी वाटचल केली. म्हणून लोकांनी त्यांना झुगारुन टाकले. हे होणारच होत. महाविकास आघाडीच्या सर्वांनी आता सत्तेची स्वप्ने विसरुन जावीत, असे सांगत उदयनराजे पुढे म्हणाले, महायुतीने राजकारण नाही तर समाजकारण केले. त्यामुळे आपल्याला माहिती आहे, आज मोठ्या प्रमाणात आर्शीवाद लोकांनी दिला आहे.
लोकाशाहीतले मतदारांनी महायुतीच्या बाजूने निर्णय घेतला. भविष्यकाळात बदल होणार नाही. महायुतीत संपूर्ण समाजाचे भविष्य आहे, असा दावा करत त्यांना पत्रकारांनी प्रश्न छेडल्यावर ते म्हणाले, शरद पवारांचा करिष्मा कुठे आहे, तो कधी होता. लोकांसमोर पर्याय नव्हता. म्हणून लोक त्यांना जवळ करत होते. आज काय त्यांच्याकडे ध्येय धोरण होतं. फक्त दुसऱ्याच्या तंगड्यात तंगड घालायचं आणि पाडापाडीचं राजकारण करायच. यापलिकडे काही नाही केले. त्यांना त्यांची पोहच पावती मिळाली आहे, जशी करणी तशी भरणी, त्यांनी जे केले त्याच फळ त्यांना मिळाले. त्यालाच कर्म म्हणतात आपल्याकडे, असा टोला खासदार उदयनराजे भोसले यांनी लगावला.
शिवेंद्रराजेंना मंत्रीपद मिळाल्यास जमा
यावेळी खासदार उदयनराजे भोसले म्हणाले की, आमदार शिवेंद्रराजेंचा विजय होणारच होता. ते नॅशनल नाही तर इंटरनॅशनल खेळाडू आहेत. आमच्या घराण्यातून मी असेन शिवेंद्रराजे असेल आम्ही दोघेही लोकांची सेवा करु, आमदार शिवेंद्रराजे यांना मंत्रीपद मिळाल्यात जमा आहे, असाही विश्वास त्यांनी केलेला आहे. यावेळी त्यांच्यासोबत सुनील काटकर यांच्यासह सर्वच कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.