सातारा प्रतिनिधी | सातारा लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीचा गुंता सुटायला तयार नाही. तो गुंता सोडवण्यासाठी आणि उमेदवारीच्या संदर्भात निर्णायक चर्चा करण्यासाठी खासदार उदयनराजे भोसले दिल्लीला रवाना झाले आहेत. राजे समर्थकांचे फोन अचानक आऊट ऑफ कव्हरेज लागू लागल्याने राजांच्या दिल्लीवारीच्या शक्यतेला पुष्टी मिळाली आहे.
खासदार उदयनराजे भोसले यांनी यंदा लोकसभेत पुढच्या दाराने सभागृहात पोहोचण्याचा चंग बांधला आहे. त्यासाठी तिकीट मिळणार की नाही, या चर्चा सुरु असताना राजेंनी मात्र तयारीला प्रत्यक्ष सुरुवात केली आहे. तरीही लोकसभा निवडणुकांच्या तिकिटाची चर्चा निर्णायक टप्प्यावर पोहचलेली नसल्याने उदयनराजेंनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली होती. त्यावेळी त्यांना राज्यात स्टार प्रचारकासह केंद्रातही मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याच्या बातम्या येऊ लागल्या. त्यामुळे नक्की सातारा लोकसभेचे चित्र काय असणार? याविषयी राजकीय धुरीणांना सुद्धा अंदाज बांधणे कठीण झाले होते.
बुधवारी सायंकाळी उदयनराजे भोसले सातारा लोकसभेच्या उमेदवारीचा गुंता सोडवण्यासाठी अचानक दिल्लीला रवाना झाले. ते दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार असल्याची चर्चा आहे. महायुतीमधील उपमुख्यमंत्री अजितदादा पवार गटाने राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून सातारा लोकसभेच्या जागेवर दावा सांगितला आहे. ही जागा अजितदादा गटाला गेल्यास उदयनराजेंची अडचण होऊ शकते. मात्र तत्पूर्वी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीकडून उदयनराजे यांनी लढावे, अशी ऑफर दिली होती. मात्र, या गोष्टीला उदयनराजेंनी नकार दिल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
उदयनराजे अजूनही साताऱ्याची जागा भाजपला मिळावी आणि त्यातही तिकीट आपल्याला मिळावे यासाठी आग्रही आहेत. या दौऱ्या संदर्भात उदयनराजे समर्थकांकडून कोणतीही माहिती देण्यात आली नाही. मात्र समाज माध्यमांवर ‘राजे साताऱ्याच्या लोकसभा तिकिटासाठी तातडीने दिल्लीला रवाना झाल्याचे वृत्त फिरु लागल्यानंतर सातारकरांच्या भुवया उंचावल्या आहेत.