शिवसागरात सी प्लेनची सुविधा करा; खा.उदयनराजेंचे केंद्रीय राज्यमंत्री मोहोळांना निवेदन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची नुकतीच भेट घेतली. यावेळी कोयना बॅक वॉटर असलेल्या विस्तीर्ण शिवसागर आणि धोम धरण जलाशयात जमीन आणि पाणी अशा दोन्ही ठिकाणी उतरणारी व उड्डाण घेणारी ॲम्फीबायस प्लेनची सुविधा निर्माण करावी, अशी मागणी मोहोळ यांच्याकडे खा. उदयनराजे भोसले यांनी निवेदनाद्वारे केली.

खासदार उदयनराजे यांनी केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांना दिलेल्या निवेदनात म्हटले, की सातारा विविधतेने नटलेला जिल्हा असून, प्रचंड पर्जन्यमान आणि दुष्काळी भाग अशा विरोधाभासी वातावरणात सातारा, जावळी, वाई, महाबळेश्वर, पाटण हे तालुके दुर्गम आणि डोंगराळ म्हणून ओळखले जातात. जागतिक पातळीवर प्रसिद्ध असलेली महाबळेश्वर आणि पाचगणी ही दोन थंड हवेच्या ठिकाणी लाखो भारतीय आणि परदेशी नागरिक पर्यटकांना साद घालत असतात.

सातारा लोकसभा मतदारसंघातील या वैशिष्ट्यामुळे येथे विकासात्मक पर्यटन रोजगाराची प्रचंड संधी आहे. राज्य शासनाने जावळी तालुक्यातील मुनावळे येथे जलक्रीडा पर्यटन विकास सुरू आहे, तसेच शिवसागर जलाशयात जागतिक स्तरावरील जलपर्यटनाची योजनाही मंजूर असून, त्याचीही कार्यवाही होत आहे. या जलपर्यटन विकासाच्या जोडीला सुमारे ९०० चौरस किलोमीटर विस्तीर्ण शिवसागर जलाशयात आणि सुमारे २० चौरस किलोमीटरच्या धोम जलाशयातून उड्डाण किंवा पाण्यावर उतरणारी ‘सी प्लेन’ उपक्रम सुरू करण्याबाबत हवाई वाहतूक मंत्रालयाने योजना राबवावी.

येथे ॲम्फीबायस प्लेन्सचा उपक्रम राबविल्यास याठिकाणी आपोआप नवीन रोजगाराच्या संधी मिळणार आहेत. केंद्राने नुकतेच मेघालय आणि आसाम राज्यामध्ये प्रायोगिक तत्त्वावर अॅम्फीबायस प्लेनची कार्यवाही सुरू केली आहे. त्यामुळे तेथील भागाच्या विकासाला निर्णयात्मक प्रोत्साहन मिळण्याबरोबरच त्या भागाचा आमूलाग्र बदल होणार आहे. त्याच धर्तीवर कोयना शिवसागर आणि धोम जलाशयामध्ये जमीन आणि पाण्यावरून टेक ऑफ व लँडिंग करणाऱ्या ‘सी प्लेन’ची सुविधा सुरू केल्यास विकासाच्या दृष्टीने चालना मिळेल, असेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.