सातारच्या वैद्यकीय महाविद्यालयासाठी केंद्रशासनाकडून विशेष सहाय्य म्हणून पहिल्या टप्यातील 100 कोटी प्रदान : खा. उदयनराजे भोसले

0
2

सातारा प्रतिनिधी । सातारच्या श्रीमंत छत्रपती संभाजीमहाराज वैद्यकीय महाविद्यालयासाठी केंद्रशासनाकडून विशेष सहाय्य म्हणून पहिल्या टप्यातील 100 कोटी रुपये प्रदान करण्यात आले आहेत. राज्यातच नव्हे तर देशामध्ये एक आदर्श वैदयकिय महाविद्यालय म्हणून छत्रपती संभाजीमहाराज वैद्यकिय महाविद्यालय लवकरच नावारुपाला आणण्याचे संर्वकष प्रयत्न केले जातील, अशी माहिती भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी सोशल मीडिया द्वारे दिली आहे.

सातारच्या वैद्यकीय महाविद्यालयासाठी अनेकांचे योगदान मिळाले असले तरी वैदयकिय महाविदयालय होण्यासाठी सर्वप्रथम 500 खाटांच्या निकषाची पूर्तता करण्यासाठी स्व.क्रांतिवीर नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात 100 खाटांचे स्वतंत्र स्त्री रुग्णालय मंजूर करुन घेण्यात आले, त्यानंतर लागणा-या विस्तीर्ण जागेचा प्रश्न राज्यशासनाशी चर्चा करुन, सोडवण्यात आल्यावर आता कृष्णानगर येथील विस्तीर्ण जागेवर वैदयकिय महाविदयालयाची उभारणी सुरु आहे. या वैदयकिय महाविदयालयात 100 विदयार्थ्यांच्या प्रवेशाची प्रक्रीया सुरु करुन, आज महाविदयालयाचे 4 थे वर्ष सुरु आहे. येत्या दोन वर्षात याठिकाणी पोस्टग्रॅज्युएशनची सुविधासुध्दा निर्माण होणार आहे.

दरम्यानच्या काळात या महाविदयालयाला स्वराज्याचे दुसरे छत्रपती श्रीमंत संभाजी महाराज यांचेच नाव देण्याचा प्रस्ताव शासनाकडून मंजूर करुन घेण्यात आला. या वैदयकिय महाविदयालयामुळे सातारच्या अर्थकारणाला बळ मिळण्याबरोबरच छत्रपती संभाजी महाराज यांचे नावामुळे सर्वाना नवीन प्रेरणा देखील सातत्याने मिळणार आहे.

वैदयकिय महाविदयालयाचे सुमारे 50 टक्के काम पूर्ण होत आलेले आहे. राज्यशासनही अंदाजपत्रकीय तरतुदीनुसार निधी उपलब्ध करुन देत आहे. तथापि वैदयकिय महाविदयालयाला विशेष सहाय्य म्हणून केंद्राकडूनही जरुर तो पाठपुरावा करुन आज रोजी 100 कोटी रुपये प्राप्त करुन घेण्यात आले असून, सदरची रक्कम महाविदयालयाकडे कालच जमा झाली आहे. केंद्राकडून एकाच वेळी इतका मोठा निधी प्राप्त होण्याची ही कदाचित पहिलीच घटना आहे.

या सहाय्य निधी मधुन महाविदयालयाची इमारत, निवास वसतीगृह, इत्यादी कामांसाठी उपयोगात येणार आहेत, आणखी दुस-या टप्यातील भरीव निधी देखिल येत्या सहा महिन्यामध्ये मिळवण्यात येणार आहे .वैदयकिय महाविदयालयाचे उभारणीचे कामात असाधारण विलंब होवू नये म्हणून आमचे सातत्याने लक्ष आहे. वैदयकिय महाविदयालयाचे बांधकाम जलद पूर्ण होण्याच्या दृष्टीने विशेष प्रयत्न केले जाणार असल्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हंटले आहे.