सातारा प्रतिनिधी | सातारा-जावळीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना वाढदिवसानिमित्त त्यांचे चुलत बंधू खासदार उदयनराजे भोसले यांनी सकाळी सोशल मीडियावर पोस्ट करून शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर दुपारी थेट शिवेंद्रराजेंच्या सुरूची निवासस्थानी जास्थानी जाऊन खास स्टाईलने शुभेच्छा दिल्या. आमचे लहानपणीचे फोटा पाहा. यांच्यामुळे मी लहानपणी मार खाल्लाय, अशी आठवण उदयनराजेंनी सांगताच उपस्थितांना हसू आवरलं नाही.
वाढदिवसाला जाणार आणि केकही खाणार
आमदार शिवेंद्रराजेंचा यांना वाढदिवसानिमित्त त्यांचे चुलत बंधू खासदार उदयनराजे भोसले यांनी सकाळीच फेसबुक पोस्ट करत शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर उदयनराजे वाई तालुक्यातील बावधनच्या बगाड यात्रेला गेले होते. त्याठिकाणी माध्यमांनी पोस्ट संदर्भात छेडलं असता उदयनराजे म्हणाले की, का पोस्ट करू नये. ते माझे बंधू आहेत. मी त्यांच्या वाढदिवसालाही जाणार आणि जबदरस्तीने केकही खाणार आहे.
दोन्ही राजेंचा सातारकरांना गोड धक्का
आमदार शिवेंद्रराजे आणि खासदार उदयनराजे यांच्यातील राजकीय संघर्ष सातारकरांनी अनेकदा पाहिलाय. सध्या दोघेही भाजपमध्ये आहेत. तरीही मागील काळात् अनेक कारणांनी दोन्ही राजे आणि त्यांचे समर्थक आमनेसामने आले होते. दोन्ही राजेंच्या गटात धुसफूस सुरू होती. विकासकामे, निधीवरून श्रेयवाद, आरोप प्रत्यारोप झाले. त्यामुळे दोन्ही गटातील संबंध सध्या ताणलेले होते. अशातच वाढदिवसाच्या निमित्ताने उदयनराजेंनी सोशल मीडियावर आणि प्रत्यक्ष निवासस्थानी जाऊन शिवेंद्रराजेंना शुभेच्छा दिल्यामुळे सातारकरांना गोड धक्का बसला आहे.
उदयनराजेंची आपल्या स्टाईलने फटकेबाजी
शिवेंद्रराजेंना शुभेच्छा दिल्यानंतर माध्यमांशी बोलताना उदयनराजेंनी त्यांच्या खास शैलीत फटकेबाजी केली. उदयनराजे म्हणाले की, अनावधानाने माझ्याकडून काही चुकलं असंल. तरी माफी नाही मागणार. पण, दिलगिरी व्यक्त करतो. यापुढं शिवेद्रराजेंनी जिल्ह्याचं, महाराष्ट्राचं काही असेल ते बघावं. आज ते पन्नाशीत पदार्पण करताहेत. आज त्यांच्या चेहऱ्यावर स्माईल आहे. त्यांचे फोटो काढा. मी सगळे बॅनर लावतो.
उदयनराजेंच्या आशिर्वादामुळं दहा हत्तीचं बळ
उदयनराजेंच्या शुभेच्छा आणि आशिर्वाद हा दहा हत्तीचं बळ देणारा असल्याची प्रतिक्रिया आमदार शिवेंद्रराजेंनी दिली. लोकसभा निवडणुकीत भाजपच्या माध्यमातून आम्ही त्यांच्या बरोबर आहोत आणि कायम राहणार. दिल्लीतून निर्णयही लवकर जाहीर व्हावा म्हणजे कामाला लागता येईल. अजून तळ्यात मळ्यात असं त्यांचंच वर काय चाललंय ते मला माहित नाही. दिल्लीतून आता सगळं शिक्कामोर्तब करून टाकावं. आम्ही उदयनराजे आणि पक्षाबरोबर प्रचार करायला लगेच तयार आहोत, अशी ग्वाही देत दोघांमधील दिलजमाईचे थेट संकेत शिवेंद्रराजेंनी दिले.