सातारा प्रतिनिधी । ज्यावेळी एखादा माणूस जी विकासकामे करतो, त्यावरून त्याची राजकीय उंची ठरवली जाते. गेल्या तीन दशकाच्या राजकारणात समाजकारणाद्वारे सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून विकासकामांना मी प्राधान्य दिले आहे. उदयनराजे केवळ तोंडाच्या वाफा सोडणारा माणूस नाही. जे विकासकामांवर टीका करतात, त्यांनी स्वतः काय केले याचे आत्मपरीक्षण करावे, असा टोला खासदार उदयनराजे भोसले यांनी आ. शिवेंद्रसिंहराजे यांना नाव न घेता लगावला.
साताऱ्यातील कनिष्क मंगल कार्यालयात सातारा विकास आघाडी सुसंवाद अभियानांतर्गत उदयनराजे भोसले यांनी कार्यकर्ता मेळाव्यात सर्वांशी संवाद साधला. यावेळी माजी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, किशोर शिंदे, निशांत पाटील, वसंत लेवे, माजी नगराध्यक्ष रंजना रावत, संग्राम बर्गे, संजय पाटील, स्मिता घोडके, सुजाता राजेमहाडिक, अनिता घोरपडे आदी उपस्थित होते.
खा. उदयनराजे म्हणाले, एखादा जो कोणी पदावर बसतो आणि कामे करत नाही त्याची त्या पदावर बसण्याची लायकी नसते. उदयनराजे मात्र विकासकामे करताना तोंडाच्या वाफा सोडत नाही. वीस वर्षांपूर्वी साताऱ्यात आलो तेव्हा मूलभूत सुविधांची प्रचंड अडचण होती. मात्र आज सातारा विविध विकासकामांनी युक्त असा आहे. जे नावे ठेवतात त्यांनी ती जरूर ठेवावी, मात्र आपण काय काम केलं, हे स्वतःला अगोदर विचारावे. ज्या वेळेला मी माझ्या समाजकारणाची साताऱ्यातून सुरुवात केली, त्यावेळेला साताऱ्याचा बायपास रस्ता नव्हता. समाजकारणातून सर्वसामान्यांचा विकास हे माझ्या कामाचे सूत्र होते.
आमच्यावर टीका करणाऱ्यांनी अगोदर आत्मपरीक्षण करावे; नाव न घेता उदयनराजेंचा शिवेंद्रराजेंना टोला pic.twitter.com/QMqNFKPlTl
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) July 17, 2023
छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये त्यांनी लोक सहभागातून राज्यकारभाराची सुसूत्रता राबवली. तो प्रामाणिक प्रयत्न सध्याच्या प्रशासनामध्ये असणे गरजेचे आहे. सातारा एमआयडीसीची स्थापना होऊन इतकी वर्ष झाली, तरी त्याचा विकास का झाला नाही? छत्रपती शाहू स्टेडियम साताऱ्यात असतानाही तेथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे सामने भरू शकत नाहीत, ही शोकांतिका असल्याचे उदयनराजे यांनी म्हंटले.