कास धरणामुळे सातारकरांचा काय फायदा होणार?; खा. उदयनराजेंनी दिलं ‘हे’ उत्तर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | पाण्याची वाढती मागणी लक्षात घेता पुढील पन्नास वर्षांचा विचार करून कास धरणाची उंची वाढविण्यात आली आहे. धरणाचे काम अंतिम टप्प्यात आले असून या धरणामुळे शहराच्या विकासाचा वेग निश्चितच वाढेल, असा विश्वास खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला.

सातारा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या कास धरणाची उंची वाढविण्याचे काम नुकतेच पूर्ण झाले असून, दुसऱ्या टप्प्यात जलवाहिनीचे काम हाती घेतले जाणार आहे. धरणापासून सातारा शहरापर्यंत सुमारे २७ किलोमीटर लांब जलवाहिनी बसवली जाणार असून हे कामही नुकतेच हाती घेण्यात आले आहे. खासदार उदयनराजे यांनी सोमवारी सकाळी धरण तसेच नवीन जलवाहिनीच्या कामाची पाहणी केली. यावेळी खा. भोसले यांनी माहिती दिली.

भविष्यातील गरज ओळखून उंची वाढविण्याचे काम

उदयनराजे म्हणाले, ‘सातारा शहराच्या दृष्टीने कास हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. उंची वाढीच्या कामामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात पाच पटीने वाढ झाली आहे. अलीकडे सातारा शहराचा विस्तार व लोकसंख्यादेखील वाढू लागली आहे. त्यामुळे भविष्यात पाण्याची अधिक गरज भासणार आहे. ही गरज ओळखून कास धरणाची उंची वाढविण्यात आली आहे.