सातारा प्रतिनिधी | १५ ऑगस्ट रोजी देश तसेच छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह पोस्ट प्रदर्शित करण्यात आल्याचा प्रकार समोर आला. यानंतर प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करत तणाव वाढू न देता पोस्ट करणाऱ्या संशयितास ताब्यात घेतले. त्यानंतर पोलीस प्रशासनाकडून कारवाई सुरु असतानाच आज खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यासह साताऱ्यातील नागरिकांनी पोलीस अधीक्षक समीर शेख यांची भेट घेतली. त्यांना निवेदन देवून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर कडक कारवाई करावी. अशा प्रवृत्तींना वेळीच ठेचा, अन्यथा माणसे पेटून उठतील, असा इशाराही दिला.
यानंतर खा. उदयनराजेंनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, आम्ही आज प्रशासनास निवेदन दिले आहे. निवेदनाच्या माध्यमातून आम्ही म्हंटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज आणि देशाबद्दल मोबाईलवर आक्षेपार्ह भाषेतील स्टेटस ठेवल्यापचे कृत्य लांच्छनास्पद आहे. सामाजिक स्वास्थ्य बिघडविण्याचे मोठे कट-कारस्थान या घटनेच्या पाठीमागे आहे. याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणी आम्ही केली आहे.
आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही जिल्हयाच्या सामाजिक – धार्मिक एकतेला आणि समाजस्वास्थ्याला धक्का लागु नये यासाठी सदैव तत्पर आहोतच तथापि अशी अपप्रवृत्त पोलिस प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाने वेळीच ठेचून काढली पाहीजे. त्यानं लगेचच दुस-या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलनासाठी जमलेल्या युवक व्यक्तींपैकी काही व्यक्तींना पाकिस्तानामधुन, धमकीचे मेसेज आले. त्याबाबतची तक्रार पालिसांकडे केली आहे. या दोन्ही घटनांमध्ये काही धागेदोरे लागेबांधे आहेत काय याचाही तपास होणे अनिवार्य आहे. या संपूर्ण प्रकरणाचे मुळाशी जावून सखोल चौकशी अंती देशद्रोहाचे गुन्हे दाखल झाले पाहीजे.
ज्या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वधर्म समभावाचा पाया रचला आणि त्यानुसार अखंडपणे धर्म – जातीच्या पलीकडे माणुसकीचा महिमा आपल्या कृतीमधुन दाखवून दिला त्यांच्या बाबतीत मराठ्यांच्या ऐतिहासिक राजधानीत घडलेल्या या प्रकाराचा आम्ही तीव्र निषेध करतो. या प्रकारातील सत्य सामारे येण्यासाठी आक्षेपार्ह पोस्ट बाबत त्या संबंधीत मुलाला कोणी प्रोत्साहन दिले, मदत केली. या प्रकरणात आणखी कोण सहभागी आहे, याची माहीती त्या ताब्यात घेतलेल्या मुलाकडूनच मिळणार आहे. त्यामुळे या आक्षेपार्ह मजकूर, क्लिपशी संबंधीत सर्वांनाच ताब्यात घेवून सखोल चौकशी झाली पाहीजे.
घडलेल्या प्रकाराच्या वेळेपासून याकामी सातारा पोलिस प्रशासनाने कोणत्या हालचाली केल्या. या प्रकरणाचा सध्याचा तपास कोणत्या वळणावर आणि दिशेने आहे याबाबतची माहीती तमाम जिल्हा वासियांसह महाराष्ट्राला होण्यासाठी आपण विस्तृत खुलासा प्रसारमाध्यमां समोर येवून करावा. तसेच या घटनेपासून विलासपूर भागात पोलिस गाडया संरक्षणासाठी उभ्या केल्या आहेत. त्या मुलाच्या कथित घराला पोलिस संरक्षण दिले आहे. परंतु धमकीचे मेसेज ज्यांना आले आहेत. त्यांना कसलेही संरक्षण दिलेले नाही, हा मोठा विरोधाभास दिसत आहे. तरी त्याबाबतचा तपास कोणत्या पध्दतीने होत आहे याचाही आपण खुलासा केल्यास जनहितासाठी निश्चितच ते स्वागतार्ह ठरेल. अधिकृतपणे पोलिस प्रशासनाकडून वस्तुस्थिती समाजाला कळाली तर ते अधिक चांगले होईल, असे निवेदनात म्हंटले असल्याचे खासदार उदयनराजेंनी सागितले.