सातारा प्रतिनिधी | अयोध्येतील मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील मंदिरांमध्ये स्वच्छता अभियान राबविण्याचे आवाहन केल्यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी देखील वाईतील गणपती घाटावर स्वच्छता केली. वाईच्या महागणपतीचे दर्शन घेऊन त्यांनी घाटावर स्वच्छता केली. साक्षात श्रीगणेशाची सेवा करत असल्याची भावना मनात निर्माण झाल्याची प्रतिक्रिया उदयनराजेंनी व्यक्त केली.
मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद…
अयोध्येत श्रीराम मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठा महासोहळा साजरा होत असताना देशाच्या विविध भागांत स्वच्छता अभियान राबविण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. त्यानुसार मुख्यमंत्र्यांसह अनेक नेत्यांनी मंदिरांच्या परिसरात स्वच्छता केली. खासदार उदयनराजेंनी देखील वाई दौऱ्यावर असताना वाईच्या गणपती घाटावरील स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला.
मान्यवरांचा स्वच्छता मोहिमेत सहभाग
खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह माजी आमदार मदन भोसले, भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सुरभी भोसले, जिल्हा उपाध्यक्ष अजय मांढरे, वाई तालुका अध्यक्ष दीपक ननावरे, शहराध्यक्ष विजय ढेकणे, महाबळेश्वर तालुका अध्यक्ष अनिल भिलारे, प्रतापगड उत्सव समितीच्या विजयाताई भोसले, सांस्कृतिक प्रकोष्ठचे पंकज चव्हाण, बाजार समिती संचालक विवेक भोसले, ग्रामोद्योग आघाडीचे सचिन घाटगे, काशिनाथ शेलार आदी मान्यवर स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते.
उदयनराजेंनी रेखाटलं कमळाचं चित्र
वाई येथे भारतीय जनता पक्षाच्या भिंतीलेखन मोहिमेतही उदयनराजेंनी भाग घेतला. यावेळी त्यांनी कमळाचे चित्र रेखाटून ‘पुन्हा एकदा मोदी सरकार, असा मजकूर लिहिला. माजी आमदार मदन भोसले, सुरभी भोसले यांच्यासह अन्य पदाधिकारीही या मोहिमेत सहभागी झाले होते.