कराड प्रतिनिधी । संतोष गुरव
समाजकार्याची आवड असलेल्या आणि त्यातून जनतेशी कायम नाळ जोडून राहिलेल्या खासदार श्रीनिवास पाटील यांचे अख्खे कुटूंबीय समाजकार्यात आहेत. यामध्ये त्यांची नातवंडंही काही मागे नाहीत. अभ्यासासोबत ते समाजकार्यही करत आहेत. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून इयत्ता दहावीच्या परिक्षेत उत्तम यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांच्या थेट घरी जाऊन पाटील कुटूंबातील नातवंड कु.अंशुमन सारंग पाटील व कु.अनुसया सारंग पाटील हे त्यांचा सत्कार करीत आहेत. श्रीनिवास पाटील फाउंडेशन व Yuva 360° च्या माध्यमातून त्यांच्या या समाजकार्याचा पाहूया ‘हॅलो महाराष्ट्र’ने घेतलेला आढावा.
साधी राहणी, रांगड्या बोलीतील भाषणे, गावोगावच्या जत्रा आणि कुस्तीची मैदाने आणि पंगतीला बसून कार्यकर्त्यांच्या पत्रावळीमध्ये जेवणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार श्रीनिवास पाटील यांच्याबद्दल सर्वांनाच माहिती आहे. प्रशासकीय सेवेचा दांडगा अनुभव राजकारणातही माहीर आणि समाजसेवेचा वसा घेतलेले पाटील कुटूंबीय आजही सर्वसामान्याच्या मदतीला धावून जात आहे. या पाटील कुटूंबियातील आता तिसरी पिढी आता समाजकार्यात पुढे येऊ लागली आहे. ती म्हणजे खासदार श्रीनिवास पाटील यांचे सुपुत्र सारंग पाटील यांचे चिरंजीव अंशुमन सारंग पाटील व कन्या कु.अनुसया सारंग पाटील होय.
कु.अंशुमन सारंग पाटील यांनी कोरेगाव तालुक्यातील रेवडी, खामकरवाडी, बनवडी, दुधनवाडी, बिचुकले, नलवडेवाडी, आंबवडे, किन्हई, कराड तालुक्यातील पार्ले, कराड, आगशिवनगर, पोळवस्ती या गावात जाऊन थाप शाब्बासकीची’ या उपक्रमातंर्गत विद्यार्थ्यांचा सत्कार केला. यावेळी त्यांना पेढा भरवून शैक्षणिक साहित्य भेट देत त्यांचे कौतुक केले.
आजोबांकडून नातवंडांच्या कार्याचं कौतुक
खासदार श्रीनिवास पाटील यांची दोन नातवंड चि. अंशुमनआणि कु.अनुसया सारंग पाटील ही देखील विद्यार्थ्यांच्या सत्कारासाठी बाहेर पडत आहेत. लहानपणापासून घरातच समाजकार्याचे संस्कार झाल्याने आता लोकांच्यात जाऊन आजोबांप्रमाणे समाजकार्य करू लागली आहेत. श्रीनिवास फाउंडेशन व Yuva 360° च्या माध्यमातून या दोघांकडून ग्रामीण भागातील प्रतिकूल परिस्थितीवर मात करून इयत्ता दहावीच्या परिक्षेत उत्तम यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांच्या थेट घरी जाऊन भेट घेत त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव केला जात आहे. आपल्या नातवंडांकडून केल्या जात असलेल्या समाजकार्याचे त्यांचे आजोबा श्रीनिवास पाटील यांना देखील कौतुक वाटत आहे.
वैष्णवीला व तिच्या आईला कोसळले रडू…
उंडाळे येथील स्वा. दादासाहेब उंडाळकर विद्यालयाची विद्यार्थिनी वैष्णवी संजय कदम हिच्या वडिलांचे तिच्या दहावीच्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच निधन झाले. वैष्णवीच्या आईने पतीच्या माघारी काबाडकष्ट करून, शेतात मजुरी करून तिला शिकवले. वैष्णवीने त्या कष्टाची जाणीव ठेऊन 10 वी मध्ये 94 टक्के इतके छान गुण मिळवले. प्रतिकुल परिस्थितीत तीने उल्लेखनीय यश संपादन केल्याबद्दल तिच्या जिद्द व चिकाटीला श्रीनिवास पाटील फाउंडेशन व Yuva 360 च्या टीमने ‘शाबासकीची थाप’ दिली. अनुसयाने तिची भेट घेत तिचे कौतुक केले व मिठाई, केक, प्रमाणपत्र व स्कूल बॅगसह शैक्षणिक साहित्य भेट देत पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. हे कौतुक बघताना वडीलांची आठवण झाली आणि माय-लेकी धाय मोकलून रडल्या.
खासदार पाटलांची तिसरी पिढी समाजकार्यात
‘थाप शाब्बासकीची’च्या माध्यमातून पाटील कुटूंबातील स्वतः खासदार श्रीनिवास पाटील त्यांच्यासोबत सुपुत्र सारंग पाटील, सून सौ. रचना सारंग पाटील, नातू कु. अंशुमन सारंग पाटील व नातं कु.अनुसया सारंग पाटील हे ग्रामीण भागात जाऊन दहावीच्या परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांचा सत्कार करत आहेत.
सुनबाई देखील समाजकार्यात पुढे
‘थाप शाब्बासकीची’च्या माध्यमातून “Yuva360°”च्या उपक्रमांतर्गत सारंग पाटील यांच्या पत्नी व खासदार श्रीनिवास पाटील फाउंडेशनच्या उपाध्यक्षा सौ. रचना सारंग पाटील देखील दहावीच्या विद्यार्थ्यांचा गौरव करीत आहेत. त्यांनी नुकतेच खंडाळा तालुक्यातील आसवली, वडगाव-पोतनीस, पळशी, शिरवळ या गावांमध्ये इयत्ता दहावीच्या परिक्षेत उत्तम यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांच्या थेट घरी जाऊन त्यांचा सत्कार केला आहे. यावेळी त्यांना पेढा भरवून शैक्षणिक साहित्य भेट देत त्यांचे कौतुक केले.