सातारा प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून तयारी केली जात आहे. खासकरून राष्ट्रीय काॅंग्रेसच्या वतीने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठका देखील घेतल्या जात आहेत. सातारा जिल्ह्यात देखील विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेस तयारीला लागली असून सातारा जिल्ह्यातील इच्छुकांच्या मुलाखतीचा कार्यक्रम आॅक्टोबरच्या पहिल्याच आठवड्यात होणार आहे. यासाठी प्रदेश काॅंग्रेस कमिटीने निरीक्षक म्हणून सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांची नियुक्ती केली आहे.
महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लवकरच जाहीर होणार आहे. यासाठी महाराष्ट्र प्रदेश काॅंग्रेस कमीटीने इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले होते. त्याची यादी प्रदेश कार्यालयाकडेही प्राप्त झालेली आहे. त्यामुळे आता इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीच्या कार्यक्रम दि. १ ते ८ आॅक्टोबदरम्यान जिल्हास्तरावर होणार आहे. यासाठी सातारा जिल्ह्यासाठी निरीक्षक म्हणून काॅंग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्ष तथा सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यामुळे आठवडाभरात सातारा जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांची मुलाखत घेतली जाणार आहे. त्यानंतर दि. १० आॅक्टोबरपर्यंत उमेदवारांच्या मुलाखतीचा गोपनीय अहवाल प्रदेश कार्यालयाकडे पाठविण्यात येणार आहे.
दरम्यान, काॅंग्रेस सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड दक्षिण, माण आणि वाई विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढविण्यासाठी आग्रही आहे. तसेच वरिष्ठांकडेही याबाबत जोरदार मागणी करण्यात आलेली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील जागा वाटपात काॅंग्रेसच्या वाट्याला जिल्ह्यातील कोणकोणते मतदारसंघ येणार हे पाहणे महत्वाचे ठरलेले आहे.