सातारा प्रतिनिधी । काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांचे चिखलाने माखलेले पाय चक्क कार्यकर्त्यांनी पाण्याने धुतल्याचा प्रकार अकोला जिल्ह्यातील वाडेगाव येथे घडला. या प्रकाराच्या निषेधार्थ आज कोरेगावात महायुतीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी पटोलेंच्या प्रतिमेस जोडे मारले.
आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्या निषेधार्थ राज्यभर महायुतीच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे पडसाद कोरेगावात देखील उमटले. कोरेगावात भाजपा, शिवसेना व इतर घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जुन्या मोटर स्टॅन्ड परिसरात दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास एकत्रित येत जोडेमारो आंदोलन केले. यावेळी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे, जिल्हा नियोजन समिती सदस्य राहुलदादा बर्गे, भाजपा तालुकाध्यक्ष उज्वला बर्गे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख संजय काटकर, दीपाली बर्गे, सुनील बर्गे यांच्या नेतृत्वाखाली आज जोडेमारो आंदोलन करण्यात आले.
नाना पटोलेंच्या बाबतीत नेमकं काय घडलं?
अकोला जिल्ह्यातील वाडेगाव येथे एका कार्यक्रमासाठी नाना पटोले सोमवारी आले होते. नाना पटोले यांची लाडूतूला होती. या कार्यक्रमाचे आयोजन त्यांच्या वाढदिवसानिमित्त अकोल्यातील वाडेगाव येथे प्रमोद डोंगरे यांच्या वतीने करण्यात आले होते. या लाडूतूला कार्यक्रमाचे आयोजनादरम्यान निराधार महिलांना साडी आणि चोळीचे वाटप करण्यात आले. संत श्री गजानन महाराजांची पालखी वाडेगाव येथे मुक्कामी होती. वाडेगाव येथे पाऊस पडला होता. यावेळी पालखी दर्शनासाठी थांबलेल्या नानासाहेब चिंचोळकर विद्यालयाच्या मैदानावर पावसामुळे मोठा चिखल झाला होता. पालखीच्या ठिकाणी सर्वत्र चिखल झाला. प्रदेशाध्यक्ष नाना पटेल यांनी चिखलातून मार्ग काढत संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतले. मैदानावरील चिखलामुळे नाना पटोले यांचे पाय मातीने माखले होते. ते नागपूरकडे रवाना होण्यासाठी तातडीने त्यांच्या वाहनाकडे गेले. मात्र, त्यांचे पाय मातीने माखलेले असल्याने त्यांनी पाय धुण्यासाठी पाणी बोलावले. आपल्या गाडीजवळ आलेल्या नाना पटोले यांचे चिखलाने माखलेले पाय एका कार्यकर्त्याने धुतले.