कोरेगाव, सातारारोड, रेवडीमध्ये पोलीस आणि BSF चे संचलन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । लोकसभा निवडणुकीच्या आचार संहितेची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. लोकसभा निवडणूक कालावधीत कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी, आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये, यासाठी कोरेगाव, सातारारोड व रेवडी येथे पोलीस आणि सीमा सुरक्षा दलाच्या पथकाच्यावतीने नुकतेच सशस्त्र संचलन करण्यात आले.

पोलीस उपअधीक्षक सोनाली कदम व कोरेगावचे पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांच्या नेतृत्वाखाली सपोनि दिवसे, पोलीस उपनिरीक्षक गणेश माने, दीपाली मुसळे, पोलीस कर्मचारी, सीमा सुरक्षा दलाचे अधिकारी, जवान व होमगार्ड पथकाने कोरेगाव पोलीस ठाण्यापासून संचालनास सुरुवात केली. जुना मोटर स्टँड, साखळी पूल, शिवतीर्थ हुतात्मा स्मारक रोटरी उद्यान, आझाद चौक व परिसरात संचलन करण्यात आले.

सातारारोड येथे पोलीस दूरक्षेत्र, बसस्थानक, बाजारपेठ, मोतीचंदनगर परिसर संचलन करण्यात आले. पोलीस वाहनांचे सायरन वाजत असल्याने नागरिकांनी संचलन पाहण्यास गर्दी केली होती. त्यानंतर संवेदनशील गाव असलेल्या रेवडी येथे संचलन करण्यात आले. लोकसभा निवडणुकीत कायदा सुव्यवस्था राखण्याबरोबर आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यास, गुन्हेगारी मोडीत काढण्यास पोलीस दल सक्षम आहे, असा संदेश जनतेला देण्यासाठी हे संचलन करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक बल्लाळ यांनी दिली.