कोयना (शिव सागर) जल पर्यटनबाबत सामंजस्य करार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ यांच्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये सामंजस्य करार काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील मुनावळे येथे शिव सागर जलाशय मध्ये जागतिक दर्जाचे जल पर्यटन विकसित करण्यात येणार आहे. या जल पर्यटन सुविधेमुळे या परिसरातील पर्यटनाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

विधानभवन येथे झालेल्या या सामंजस्य करारावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री सातारा जिल्हा शंभूराज देसाई, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, पर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोज,महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी -शर्मा, जलसंपदा विभागाचे उपसचिव अतुल कपोले, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे सल्लागार सारंग कुलकर्णी यावेळी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, प्रकल्पाच्या माध्यमातून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे ५ हजार पेक्षा अधिक स्थानिक नागरिकांना रोजगार मिळेल आणि १०० कोटीपेक्षा अधिक पर्यटनातून आर्थिक उलाढाल होईल. या परिसराला प्रकल्पामुळे मोठा फायदा होणार आहे, हे लक्षात घेऊन तो वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच प्रकल्प राबवतांना स्थानिक बोट चालकांना त्यात सहभागी करून घेण्याच्या सूचना यावेळी मुख्यमंत्र्यांनी केल्या.

नैसर्गिक वरदान लाभलेला परिसर

शिवसागर जलाशयात जल पर्यटन विकसित करण्यासाठी मोठी संधी आहे. कोयना (शिव सागर), ता. जावळी हा परिसर येथील सह्याद्री डोंगराच्या रांगा,गर्द झाडी, निळेशार पाणी ,समृध्द जैवविविधतेचे आगार असलेला ,नैसर्गिक वरदान लाभलेला परिसर आहे. नव्याने होणाऱ्या जलपर्यटन केंद्राच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार मिळावा या भागाचा सर्वांगीण विकास हे जल पर्यटन केंद्र विकसित करण्यात येणार आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळा च्या माध्यमातून या प्रकल्पासाठी ४५ कोटी ३८ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.