विधानसभेसाठी जिल्ह्यात 70 टक्क्यापेक्षा जास्त मतदान; पहा कोणत्या मतदार संघात किती झाले मतदान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | विधानसभा निवडणूक 2024 ची मतदान प्रक्रिया सातारा जिल्ह्यातील आठही मतदारसंघात बुधवारी शांततेत पार पडली. जिल्ह्यात सरासरी अंदाजे 70 टक्क्यापेक्षा जास्त मतदान झाले. सातारा जिल्ह्यात आजपर्यंत झालेल्या विधानसभा निवडणुकीत यावर्षी सर्वात जास्त मतदान झाले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.

संपूर्ण जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. प्रशासनाने मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल, मतदान केंद्रांवर पुरविण्यात आलेल्या सोयीसुविधांबद्दल मतदरांनी समाधान व्यक्त केले. मतदानाचा टक्का वाढावा, मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडावी, यासाठी प्रशासनाने अत्यंत शिस्तबद्ध व नियोजनबद्ध जय्यत तयारी केली होती. ज्या ठिकाणी मतदानासाठी प्रलोभनांचा वापर केला जावू शकतो, अशी शक्यता असणाऱ्या ठिकाणी ड्रोन कॅमेराद्वारे नजर ठेवण्यात आली.

कोणत्याही मतदाराचे नाव मतदार यादीतून वगळले गेल्याने मतदान करता आले नाही, असा प्रकार जिल्ह्यात कोठेही घडला नाही. एकूणच सातारा जिल्ह्यातील आठही मतदारसंघांमध्ये अत्यंत शांततेत शिस्तबद्धरितीने व उत्साहात मतदान प्रक्रिया पार पडली. याबद्दल जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेचे व नागरिकांचे आभार मानले.

पोलिंग पार्टी बाबतीचा आत्तापर्यंतचा अनुभव बऱ्याचता कष्टदायक असतो. यावेळी पहिल्यादाच पोलिंग पार्टीजची अत्यंत काळजी घेण्यात आली होती. साहित्य ताब्यात घेण्यापासून जमा करण्यापर्यंत सर्वच बाबींमध्ये काळजी घेण्यात आली होती.पोलिंग पार्टीजला खूप वेळ उभे रहावे लागू नये अशा पद्धतीने साहित्य वितरणाचे नियोजन करण्यात आले होते.

त्यांच्या बसण्याची, नाष्ट्याची अन्य अनुषंगिक सुविधांची संपूर्ण काळजी घेण्यात आली. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी असा प्रकारचा अनुभव व्यक्त करत प्रशासनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. पोलीस आणि महसूल प्रशासनामध्ये अतिशय उत्तम समन्वय दिसून आला. मतदान आणि पोलिंग पार्टीज यांचीही सोय लक्षात घेऊन सर्वोत्तम काळजी घेण्यात आली होती.

जिल्ह्यात अनेक ठिकाणी ज्येष्ठ मतदारांनी स्वत: मतदान केंद्रावर जावून मतदान करण्यासाठी पसंती दिली.वृद्ध, दिव्यांग मतदारांसाठी व्हिल चेअर, बैठक व्यवस्था, पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. कोणत्याही ठिकाणी मतदारांना लांबच लांब रांगामध्ये ताटकळ उभे रहावे लागले नाही. मतदारांना आकर्षीत करण्यासाठी मतदान केंद्रावर उत्साहवर्धक वातावरण ठेवण्यासाठी सखी मतदान केंद्र, गुलाबी मतदान केंद्र, बांबु मतदान केंद्र, जय जवान मतदान केंद्र, फळांचे गाव यावर वेगवेगळ्या थिंमवर मतदान केंद्रे सजविण्यात आली होती.

सर्वच मतदान केंद्रांच्या बाहेर आकर्षक रांगोळी व सजावट करुन, अनेक ठिकाणी गुलाब पुष्प देवून मतदारांचे स्वागत करण्यात येत होते. एकूण सातारा जिल्ह्याने लोकशाहीचा सर्वात मोठा महोत्सव अत्यंत उत्साहाने साजरा केला.

सातारा जिल्ह्यातील आठही मतदारसंघांमध्ये अत्यंत शांततेत शिस्तबद्धरितीने व उत्साहात मतदान प्रक्रिया पार पडली. नागरिकांनी मतदान प्रक्रियेत उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला. संपूर्ण यंत्रणेने दक्ष राहून अत्यंत परिश्रमपूर्वक मतदान प्रक्रिया पार पाडली. याबद्दल जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेचे व नागरिकांच आभार मानले.

सातारा- जावळीत ६३.५२ टक्के मतदान

सातारा जावळी विधानसभा मतदारसंघात बुधवारी शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. सायंकाळी पाचपर्यंत याठिकाणी झालेल्या एकत्रित मतदानाची टक्केवारी ६३.५२ टक्के इतकी असल्याची माहिती निवडणूक यंत्रणेकडून देण्यात आली. सकाळच्या सत्रात शहरासह परिसरातील जावळीतील मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी होती. यानंतर दुपारच्या सत्रात मतदारांची संख्या रोडावली. दुपारी तीननंतर पुन्हा एकदा मतदान केंद्रांवर मतदारांची मोठी गर्दी होण्यास सुरुवात झाली. ज्येष्ठ तसेच दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रात नेण्यासाठी यावेळी केंद्राबाहेरील स्वयंसेवकांची दिवसभर धावपळ सुरू होती. सायंकाळी सहा वाजल्यानंतर केंद्रात असणाऱ्या मतदारांना टोकन देत केंद्रांची प्रवेशद्वारे बंद करण्यात आली. सायंकाळी पाचपर्यंत सातारा- जावळी विधानसभा मतदारसंघात ६३.५२ टक्के इतके मतदान झाले.

माणमध्ये ७१.४१ टक्के मतदान

माण विधानसभा मतदारसंघात एकूण एकवीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले असले, तरी भाजपचे जयकुमार गोरे व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रभाकर घार्गे यांच्यात काट्याची टक्कर आहे. त्याचाच प्रत्यय आज मतदानासाठी लागलेल्या चढाओढीतून पाहायला मिळाली. कार्यकर्त्यांनी घेतलेल्या कष्टाचा परिणाम म्हणून २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपेक्षा यावेळी मतदानात मोठी वाढ झाली. मतदारसंघातील माण व खटाव तालुक्यांत तीन तालुक्यांचा समावेश असलेल्या आज ७१.४१ टक्के मतदान झाले.

फलटण- कोरेगावला ७१.०५ टक्के मतदान

फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघात एकूण ३५५ बूथ आहेत. त्यापैकी पुरुष मतदार १,७२,९४०, तर महिला मतदार १,६६,७०८ असे एकूण ३,३९,६६२ मतदार आहेत. त्यापैकी पुरुष मतदान १,२६,३४१, तर महिला मतदान १,१५,०८१ व तृतीयपंथी ८ असे एकूण मतदान २,४१,३२९ झाले आहे. मतदारसंघात सुमारे एकूण ७१.०५ टक्के मतदान झाले. या वेळी मतदारांचा प्रचंड उत्साह असल्याचे दिसून आले.

पाटणमध्ये सुमारे ७५ टक्के मतदान

पाटण विधानसभा मतदारसंघाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सरासरी ७५ टक्के मतदान झाले आहे. सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदानाचा टक्का वाढला असून, कोणाला कौल देईल. याबाबत आता राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत. शनिवारी (ता. २३) होणाऱ्या मतमोजणीत स्पष्ट होणार आहे. त्यामुळे पाटण विधानसभा मतदारसंघ निकालाबाबत उत्सुकता पणाला लागली आहे.

कराड दक्षिणला ७६. २६ टक्के मतदान

कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवारी चुरशीने मतदान झाले. कराड दक्षिणला ७६.२६ टक्के झाले. मतदानादरम्यान अपवाद वगळता कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. मतदान केंद्राच्या परिसरात मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

कराड उत्तरला ७४.७३ टक्के मतदान

कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवारी चुरशीने मतदान झाले. कराड उत्तरला ७४.७३ टक्के मतदान झाले. काही ठिकाणी मतदान यंत्रांत बिघाड झाला. मात्र, तेथील मतदान यंत्रे बदलल्यानंतर पुन्हा मतदान पूर्ववत सुरू झाले. मतदान केंद्राच्या परिसरात पोलिस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. मतदारसंघातील विरवडे गावातील आत्माराम विद्यामंदिर येथील एका बूथवर मतदान सुरू होते. त्याचदरम्यान निवडणूक केंद्र अधिकाऱ्याच्य विरोधात काही ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्याला निवडणूक यंत्रणेकडून तेथून बाजूला करण्यात आले. त्याचदरम्यान झालेल्या वादावादीमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. किरकोळ अपवाद वगळता कराड उत्तरमध्ये उत्साहाच्या वातावरणात मतदान पार पडले.

वाईमध्ये ६७.५८ टक्के मतदान

वाई विधानसभा मतदारसंघात वाई, खंडाळा आणि महाबळेश्वर या तीन तालुक्यांचा समावेश असलेल्या मतदार संघात ६७.५८ टक्के मतदान झाले. कार्यकर्त्यांमधील किरकोळ वाद वगळता मतदान शांततेत पार पडले.

कोरेगाव मतदारसंघात ७७.६४ टक्के मतदान

विधानसभा मतदारसंघात आज ७७.६४ टक्के मतदान अत्यंत उत्साहात पार पडले. भोसे येथे दोन गटांत झालेल्या किरकोळ मारामारीची घटना वगळता सर्वत्र शांततेत मतदान पार पडले. सकाळी ग्रामीण व शहरी भागात मतदानासाठी मतदान केंद्रांवर गर्दी दिसत होती. दुपारी ऊन वाढू लागल्यावर ही गर्दी थोडी कमी झाली होती. मात्र, दुपारी तीननंतर पुन्हा जी गर्दी वाढू लागली ती सायंकाळी सहापर्यंत कायम राहिली. सकाळी ९ ते ११ या कालावधीत सुमारे २१, दुपारी तीनपर्यंत ५३.८६, तर सायंकाळी पाचपर्यंत ५९.६१ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर सायंकाळी सहा वाजता मतदानाची सांगता झाली. मात्र, पुसेगावसह अन्य एक दोन ठिकाणी उशिरापर्यंत मतदान सुरूच होते. ७७.६४ टक्के मतदान झाले आहे.