कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात सध्या डोळे येण्याची साथ जोरात असून मोठ्या प्रमाणात रुग्णांमध्ये ही लक्षणे दिसू लागली आहेत. फलटण व सातारा तालुक्यात तर या डोळे आलेल्या रुग्णांनी शंभरीच पार केली असून जिल्ह्यात तब्बल 636 नागरिकांना डोळे आले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात 258 रुग्ण उपचारद्वारे बरे झाले असून सध्या 378 रुग्णांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
सातारा जिल्ह्यात एका नव्या साथीने चांगलेच थैमान घातले आहेत. जिल्ह्यात साथरोगाबरोबर आता डोळ्यांच्या रोगाने थैमान घातले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत जावळी 24, कराड 74, खंडाळा 63, खटाव 50, कोरेगाव 68, महाबळेश्वर 7, माण 25, पाटण 32, फलटण 103, सातारा 102, वाई 88 अशा 636 इतक्या नागरिकांना डोळे आले आहेत. यापैकी जावळी 9, कराड 16, खटाव 12, कोरेगाव 24, महाबळेश्वर 1, माण 2, पाटण 11, फलटण 101, सातारा 79, वाई 3 असे 258 रुग्ण पूर्णत: बरे झाले असल्याची माहिती आरोग्य विभागातून देण्यात आली आहे.
सध्या सातारा जिल्ह्यात बहुतांश भागात अजूनही लोकांना डोळे येण्याची लागण सुरु आहे. हा आजार गंभीर स्वरुपाचा नसून योग्य ती काळजी घेतल्यास व त्वरीत डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार केल्यास हा आजार लगेच बरा होतो. डोळे आल्यास डोळ्याच्या डॉक्टरांकडे तपासणी करावी, डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे औषधोपचार करावा, डोळ्यांना स्वच्छ पाण्याने दिवसातून तीन ते चार वेळा धुवावे व स्वच्छ कपड्याने पुसावेत, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे यांनी केले आहे.
डोळे येण्याची लक्षणे कोणती?
डोळ्यांना सूज येणे, डोळ्यांमधून पाणी गळणे, डोळे लाल होणे, डोळ्यांना खाज येणे, पापण्या चिकटवणे, डोळ्यातून चिकट पिवळा, पांढरा रंगाचा द्रव बाहेर येणे, डोळ्यांमध्ये आग होणे, डोकेदुखी, कान जवळचा भाग सुजणे किंवा कान दुखी, प्रकाशामुळे डोळ्यांना होणारा त्रास.
डोळे येण्याची नेमकी कारणे कोणती?
सातारा जिल्ह्यात जरी डोळे येण्याची साथ सर्वत्र सुरु असली तरी हि साथ फक्त जिल्ह्यात नाही तर राज्यातील अनेक ठिकाणी सुरु आहे. नेमके डोळे येतात कसे? काय आहेत त्यामागची करणे? याबाबत सांगायचे झाले तर डोळ्याचा विषाणूजन्य संसर्ग मुख्यत्वे डिनो व्हायरसमुळे होतो. डोळे आलेल्या व्यक्तींच्या सहवासात आल्यामुळे संसर्ग वाढत जातो. डोळे आलेल्या व्यक्तीचा हात, रुमाल, टॉवेल, चष्मा, ब्युटी क्रीम, काजळ किंवा साबण इत्यादी वस्तूंमुळे संसर्ग होऊ शकतो.
डोळे आल्यास अशी घ्यावी काळजी :
डोळे आल्यावर सतत डोळ्यांना हात लावू नये, डोळे पुसण्यासाठी स्वच्छ कपड्याचा वापर करावा, डोळ्यांना हात लावल्यावर लगेच साबण लावून हात धुवावेत, साधा कोणताही पण स्वच्छ असा चष्म्याचा वापर करावा. धूर, हवा, लाईटचा प्रकाश यांचा सहवास टाळावा. शाळा, वसतिगृहे या संस्थात्मक ठिकाणी अशी लक्षणे अथवा साथ आली असेल तर डोळे आलेल्या व्यक्तीबाबत डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली योग्य ती खबरदारी घ्यावी.