‘विकसित भारत संकल्प’ यात्रेच्या 274 ग्रामपंचायतीमधील कार्यक्रमात 29 हजाराहून नागरिकांचा सहभाग

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । केंद्र शासन पुरस्कृत योजना तळागाळातील नागरिकांना पोहचविण्याच्या दृष्टीने सुरू झालेल्या ‘विकसित भारत संकल्प यात्रे’ला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. २७४ ग्रामपंचायतीत झालेल्या कार्यक्रमात २९ हजार २८८ नागरिकांनी सहभाग घेतला. यावेळी नागरिकांना विविध योजनांचा लाभ देखील देण्यात आला.

विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांची माहिती चित्रफिती आणि हस्तपत्रकांच्या माध्यमातून देण्यात येत आहे. नागरिकांशी संवाद साधून लाभार्थ्यांची नोंदणीदेखील करून घेण्यात येत आहे. यात्रेच्या माध्यमातून सुरक्षा विमा योजनेचा १ हजार २१० लाभार्थी, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा ६३३ लाभार्थ्यांना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा (घरघुती गॅस जोडणी) ४५६ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला.

जिल्ह्यात १०० टक्के आयुष्मान भारत कार्ड वाटप झालेल्या १३२ ग्रामपंचायती आहेत. तसेच हर घर जल योजना झालेल्या ६८ पैकी ३० ग्रामपंचायतींना आणि ओडीएफ प्लस ७७ मॉडेल ग्रामपंचायतींपैकी ५३ ग्रामपंचायतींना अभिनंदनपत्र वितरीत करण्यात आले. भूमी अभिलेखांचे १०० टक्के डिजिटायझेशन झालेल्या १२४ ग्रामपंचायती जिल्ह्यात आहेत.

आरोग्य शिबिराअंतर्गत १० हजार १८० नागरिकांची आरोग्य तपासणी, २८ हजार २९८ नागरिकांची क्षयरोग तपासणी, १५७ नागरिकांची सिकल सेल आजाराची तपासणी करण्यात आली. २८० खेळाडू, १ हजार ७५७ विद्यार्थी, १५२ स्थानिक कलाकार आणि २ हजार ५४ महिलांना प्रोत्साहनपर पुरस्कार देण्यात आले. यात्रेदरम्यान १९ हजार ६२१ नागरिकांनी संकल्प प्रतिज्ञा घेतली.

मृदा आरोग्य पत्रिकेची १०२ प्रात्यक्षिके आयोजित करण्यात आली. तसेच ठिकठिकाणी शेतकऱ्यांसाठी ड्रोन प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात येत आहे. यात्रेद्वारे नैसर्गिक शेती करणाऱ्या १०९ शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात आला. विकसित भारत संकल्प यात्रा २६ जानेवारी २०२४ पर्यंत सुरु राहणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी यात्रेमध्ये सहभागी होऊन केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन सातारा जिल्हा परिषद व जिल्हा प्रशासनाने केले आहे.