सातारा प्रतिनिधी | जागतिक वारसास्थळ म्हणून ओळख असलेल्या सातारा जिल्ह्यातील कास पठारावर कास पठार कार्यकारी समिती, वनविभागाच्यावतीने पर्यटकांसाठी पावसाळी पर्यटन सुरू झाले असून पुष्प पठाराचे सौंदर्य स्वानुभवताना पर्यटकांत उत्साहाचे वातावरण आहे. नैसर्गिक मंडपघळ, भदार तळे, मचान, कुमुदिनी तलाव विविध पॉईंटकडे पर्यटक आकर्षित होत आहेत.
निसर्गरम्य परिसर, चोहोबाजूला दाट हिरवीगार झाडी, पावसाची संततधार, धुक्याची दुलई, कोसळणारे धबधबे, निसर्गाचे वरदान असलेल्या कास पठार, कास धरण पर्यटनस्थळी जिल्हा, राज्यभरातून पर्यटकांची वर्दळ सुरू आहे. पठारावरील विविध पॉईंट पाहण्याची मागणी पर्यटक करत होते. फुलांच्या राखीव क्षेत्रात पर्यटक जाऊ नयेत यासाठी सुरक्षिततेसाठी कर्मचारी दिवसभर कर्तव्य बजावत आहेत. पठाराचे संवर्धन, संगोपन करण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात शुल्क आकारणी सुरू आहे.
या ठिकाणी जुन-ऑक्टोबर दरम्यान तृण, कंद, वेली, वृक्ष, झुडपे, आर्किड, डबक्यातील वनस्पतींना अत्यंत आकर्षक निळ्या, जांभळ्या, लाल रंगाची फुले येतात. मध्य ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये विविधरंगी दुर्मिळ फुलांचे गालिचे पर्यटकांना आकर्षित करतात. काही तुरळक फुलांचा, कुमुदिनीच्या फुलांचा सूर्योदय मावळेपर्यंत नोव्हेंबर जातो.
कास पठारावर फुलांसाठी सध्या पोषक वातावरण असून अद्याप फुलांचा हंगाम सुरू नसून ऑगस्टमध्ये सुरू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. फुलांचा हंगाम सुरू होईपर्यंत पावसाळी पर्यटनात प्रति व्यक्ती पन्नास रुपये शुल्क आकारून सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने राजमार्गावरून कुमुदिनी तलाव, कास धरण दर्शन मचान, नैसर्गिक मंडपघळ, भदार तळे पॉईंट पर्यटकांसाठी खुले झाल्यामुळे पर्यटकांना कासचे पर्यटन घडत आहे. पर्यटकांसमवेत सुरक्षा कर्मचारी असून सकाळी आठ वाजल्यापासून ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत पर्यटन सुरू आहे.