सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील सातारा, कराड, पाटण, वाई, महाबळेश्वर व जावली तालुक्याच्या पश्चिम भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असतो. यंदा तर पावसाचे प्रमाण अधिक आहे. या पार्श्वभूमीवर जावली, महाबळेश्वर व पाटण या तालुक्यातील शाळांना पावसाळी सुट्टी जाहीर केली आहे. पश्चिम भागातील दर्याखोर्यात पावसाचे प्रमाण अधिक असल्यामुळे या भागातील जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे. त्यामुळे पश्चिम भागातील पाटण, महाबळेश्वर व जावली या तालुक्यांमधील डोंगरकपारीतील 334 जिल्हा परिषद शाळांना सुमारे दीड महिन्याची पावसाळी सुट्टी देण्यात आली आहे.
1 जुलैपासून या शाळांना सुट्टी लागली असून आता 12 ऑगस्टला या शाळा भरणार आहेत. पाटण तालुक्यातील अतिवृष्टी, भूस्खलन बाधीत 186 शाळा आहेत. महाबळेश्वर तालुक्यातील 118 व जावली तालुक्यातील 30 शाळा आहेत. त्यामुळे या भागातील प्राथमिक शाळांना जिल्हा परिषद प्रशासनामार्फत दरवर्षी पावसाळ्यात सुट्टी देण्यात येत असते.उन्हाळ्यात मात्र या शाळा सुरू असतात. यंदा पाऊस अधिक असल्याने विद्यार्थ्यांना शाळेतच जाता येत नाही.
पाटण तालुक्यातील 186, महाबळेश्वर तालुक्यातील 118 व जावली तालुक्यातील 30 शाळा अशा मिळून 334 शाळांना पावसाळी सुट्टी देण्यात आली आहे. ही सुट्टी दि. 1 जुलै ते 12 ऑगस्ट अशी राहणार आहे. सर्व पावसाळी सुट्टी असणार्या शाळांनी पावसाळी शाळांसाठी असणार्या वेळापत्रकाचे पालन करावे. याबाबतच्या आवश्यक त्या सूचना गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकार्यांमार्फत संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांना देण्यात आल्या आहेत.