देशात राजकारणातील वस्तादांचे वस्ताद शरद पवार आहेत, त्यामुळे इथून पुढं माणमध्ये नुरा कुस्ती चालणार नाही; धैर्यशील मोहिते पाटलांचा थेट इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | “देशात राजकारणातले वस्ताद कोण आहेत? तुम्हाला सर्वांना माहिती आहे. वस्तादांचे वस्ताद शरद पवार आहेत. माण तालुक्याच्या जनतेने ठरवलं आहे की, इथून पुढं माण तालुक्यात नुरा कुस्ती चालणार नाही. कसलीच नुरा कुस्ती चालणार नाही आणि मॅच फिक्सिंगही चालणार नाही. वस्ताद आपल्याला योग्य उमेदवार देणार आहेत. आपल्या सर्वांच्या मनातला उमेदवार वस्ताद देतील”, असा इशारा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माढाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील थेट इशारा दिला.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने माणमध्ये कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाप्रसंगी खा. मोहिते पाटील म्हणाले की, माण तालुक्यातील शासकीय क्रीडा संकुल अर्धवट स्थितीत आहे, वडूजची सुध्दा तशीच अवस्था आहे. देशाला ऑलिंपिक खेळाडू देणाऱ्या माण तालुक्यात गेल्या पंधरा वर्षांत एकही क्रीडा संकुल उभे राहू शकलेले नाही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. त्यामुळे मी ठरवलंय दिल्लीच्या अधिवेशनानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करुन ही क्रीडा संकुल कशी होत नाहीत हे मला बघायचं आहे.

माण तालुक्यातील पालक हे अत्यंत अडचणीच्या परिस्थितीतून क्रीडा क्षेत्रात आपली मुलं पुढं आणत आहेत. पण त्या मुलांना क्रीडा क्षेत्रातील अत्याधुनिक साेयी सुविधा मिळत नाहीत, हे काही बरोबर नाही. पैलवानांनी इथून पुढे मॅटच्या कुस्तीवर लक्ष केंद्रित करावे. तसेच, महिला कुस्तीगीरांना प्रोत्साहन देवून त्यांच्या मैदानाचे आयोजन करावे, असे आवाहन खासदार मोहिते पाटील यांनी केले

नागरिकांची पाण्यासाठी मोठी वणवण चालू…

जिहे कटापूर अथवा उरमोडी प्रकल्पातून माण नदीला पाणी सोडून बंधारे भरून घ्यावे व येराळवाडी तलावात पाणी सोडावे म्हणून सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई साहेब मागणी केली. म्हसवड नगर परिषदेला सध्या 8 दिवसातून एकदा पिण्याचे पाण्याचा पुरवठा केला जात आहे व सध्या वाडीवस्तीसाठी टँकरनी पाणी पुरवठा केला जात आहे. यामुळे येथील नागरिकांची पाण्यासाठी मोठी वणवण चालू आहे, असंही मोहितेंनी स्पष्ट केले.