कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील शिरगांव मधील सामाजिक परिवर्तनशील व पुरोगामी विचारसरणी असलेल्या मोहिते कुटुंबाने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. कुटुंबात दि. ३१ डिसेंबर रोजी मानसिंगराव मोहिते (बाबा) यांचे सुपुत्र जयंत यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. अंत्यविधीनंतरच्या तिसऱ्या दिवसाचे प्रचलीत संपूर्ण विधी नैवेद्य, पिंडदान, कावळ्याचे स्तोम, मुंडन, आत्मापूजन पौराहित्य आदी कालबाह्य तरीही परंपरेने करण्यात येणाऱ्या सर्व गोष्टींना फाटा देऊन फक्त फुले वाहून व अभंग म्हूणन श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच पुढील संपूर्ण प्रचलित विधी न करता रक्षाविसर्जन शेतात करण्याचा निर्णय घेण्यात घेतला. यावेळी मोहिते कुटुंबाने घेतलेल्या या निर्णयास शिरगाव ग्रामस्थांनी व गावातील समाज बांधवांनी देखील मान्यता दिली.
कराड तालुक्यातील शिरगाव ग्रामस्थांच्या वतीने अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. गावातील ग्रामस्थ धार्मिक, समाज कार्यात सहभागी होत सर्व सण, उत्सव आनंदाने साजरा करतात. गावात कोणत्याही कुटूंबात आनंदाचा कार्यक्रम अथवा दुःखाचा प्रसंग घडल्यास सर्व ग्रामस्थ त्यामध्ये सहभागी होतात. दरम्यान, प्रतिष्ठित मानसिंगराव मोहिते (बाबा) यांचे कुटूंब शिरगाव येथे अनेक वर्षांपासून आहे. कुटूंबाला राजकीय वारसा देखील लाभला आहे. या कुटूंबावर नुकताच दुःखाचा डोंगर कोसळला. मानसिंगराव मोहिते (बाबा) यांचे सुपुत्र जयंत यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्याच्या कुटूंबात घडलेल्या या दुःखाच्या घटनेसोबत गावही त्यांच्यासोबत राहिला.
दरम्यान, जयंत मोहिते यांच्यावर अंत्यविधी केल्यानंतर कुटूंबाने एक निर्णय घेतला. अंत्यविधीनंतरचा संपूर्ण विधी नैवेद्य, पिंडदान, कावळ्याचे स्तोम, मुंडन, आत्मापूजन पौराहित्य यांना फाटा देऊन पुढील संपूर्ण प्रचलित विधी होणार नसल्याचे कुटूंबाने मनोदय ग्रामस्थांपुढे व्यक्त केला. त्यानंतर तसेच रक्षाविसर्जन सुद्धा नदीच्या प्रवाहत न सोडता तो शेतात विसर्जन करण्याचा निर्णय घेतला.
मोहिते कुटुंबाने घेतलेला हा निर्णय ग्रामस्थ व त्यांच्या भावकीतील लोकांनी मान्य करत त्यास सहमती दर्शवली. मोहिते कुटूंबियांनी घेतलेला हा निर्णय सुद्धा प्रदूषण मुक्त पर्यावरण पूरक असा समाज हिताचा आहे. अशा स्वतःच्या दुःखद प्रसंगात प्रचलित प्रथा बदलणे व स्वतः अनुकरण करणे हे फार मोठं धैर्याचे काम आहे. या कामाचे अनुकरण समाज, गावातील इतर ग्रामस्थ देखील करतील परंतु यातुन जो आदर्श मोहिते कुटूंबाने घालून दिला तो आदर्शवत आहे.
मोहिते कुटुंबाने घेतलेला निर्णय महत्वाचा
आमच्या गावातील मानसिंगराव मोहिते (बाबा) यांच्या कुटूंबावर नुकताच दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांच्या कुटूंबातील मानसिंगराव मोहिते (बाबा) यांचे सुपुत्र जयंत यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांनी सुपुत्राच्या अंत्यविधीनंतर जो एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. तो निर्णय हा महत्वाचा असल्याचे शिरगावचा सरपंच योगेश यादव यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’शी बोलताना सांगितले.