कराड – ढेबेवाडी महामार्गावर सुरक्षेच्या उपाययोजना राबवा अन्यथा रास्ता – रोको; मनसेचा इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून कराड-ढेबेवाडी महार्मार्गाचे काम करण्यात आले आहे. मात्र, सुरक्षेच्या उपाययोजना राबवल्या नसल्याने वारंवार अपघात होत असून नागरिकांना प्राण गमवावे लागत आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यावर आवश्यक तिथे पांढरे पट्टे, रबलरचे गतीरोधक, गाव, शाळा, वळणरस्ता दर्शक पाटया लावाव्यात. अन्यथा दि. 20 जानेवारी रोजी कोळे बसस्थानक येथे रास्ता-रोको आंदोलन करू, असा इशारा मनसेचे कराड तालुकाध्यक्ष दादासाहेब शिंगण यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

याबाबत मनसेचे तालुकाध्यक्ष दादासाहेब शिंगण यांच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग कराडचे उपविभागीय अधिकारी प्रमोद चौधरी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी कराड दक्षिण विभाग प्रमुख शंभुराज भिसे-पाटील, दिपक मुळगावकर, अंकुश कापसे, अनिकेत पवार, दिपक रेठरेकर व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी दादासाहेब शिंगण म्हणाले की, कराड – ढेबेवाडी महामार्गावरील चकाचक रस्ता झाल्याने वाहनांचा वेग प्रचंड वाढला आहे. त्यामुळे अपघाताचा धोकही वाढला आहे. रस्त्याचे काम पुर्ण झाले असले तरी अपघात टाळण्यासाठी या रस्त्यावर सुरक्षेच्या उपाययोजना अद्याप राबवलेल्या नाहीत. त्यामुळे वारंवार अपघात होत आहेत. वास्तविक रस्त्याच्या दुतर्फा असलेली गावे, शाळा, लोकवस्ती, वळण रस्ते आदी बाबतच्या पाटया लावण्याची आवश्यकता आहे. या रस्त्याने वाहन चालवणाऱया नवीन वाहन चालकांना शाळा व गावांचा आंदाज येत नसल्याने अपघाताचा सामना करावा लागत आहे.

तसेच रस्त्याच्यामध्ये असलेल्या दुभाजकात मोठया प्रमाणात गवत वाढले असल्याने दुभाजकातील गवत खाण्यासाठी जनावरे महामार्गावर येत आहेत. त्यामुळेही अपघात होत आहेत. तसेच रस्त्यालगत असलेली गाव, लोकवस्ती व शाळेनजीक रबलरचे गतीरोधक करण्याची आवश्यकता आहे. रोड क्रॉसिंगवरती झेब्रा क्रॉसिंगचे पांढरे पट्टे आखण्याची आवश्यकता आहेत. तसेच अनेक ठिकाणी बांधलेल्या मोऱहींना संरक्षक पाईप अथवा संरक्षक कठडे बांधलेले नाहीत. त्यामुळे अपघातग्रस्त वाहने ओढा अथवा नाल्यात पडत आहेत. तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने याची गांभिर्याने दखल घेऊन सुरक्षेच्या सर्व उपाययोजना राबवाव्यात. अन्यथा 20 जानेवारी रोजी कोळे येथील बसस्थानक परीसरात रास्तारोको करू, असा इशारा शिंगण यांनी दिला आहे.

महिनाभारात सुरक्षेच्या उपाययोजना राबवणार : चौधरी

कराड-ढेबेवाडी रस्त्यावर अपघात टाळण्यासाठी येत्या महिनाभरात आवश्यक तिथे आवश्यक त्या सुरक्षेच्या उपाययोजना राबवण्यात येतील. रस्त्यावरील पांढरे पट्टे, रबलरचे गतीरोधक, झेब्रा क्रॉसिंग करणे आदीबाबत संमंधितांना तत्काळ सुचना देण्यात आल्या आहेत. तसेच शाळा, गाव व वळण रस्यांबाबत दिशादर्शक पाटयाही लावकरच लावण्यात येतील, असे आश्वासन उपविभागीय अधिकारी प्रमोद चौधरी यांनी दिले.