कराड प्रतिनिधी | विजय दिवस चौकानजीक रस्त्याकडेला असलेल्या सुमारे साठ वर्षे जुन्या रेन ट्रीचे बुंध्याला कटरच्या साह्याने कापण्यात आल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती मिळताच मनसेच्या वतीने गुरुवारी त्याच झाडाखाली निदर्शने करत संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्याची मागणी केली. दरम्यान, पालिका व पोलिस प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
शहरातील विजय दिवस चौकातून बसस्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्याकडेला सुहास रोलिंगसमोर सुमारे साठ वर्षे जुने रेन ट्रीचे झाड आहे. या झाडाच्या बुंध्याचा घेर जवळपास अडीच ते तीन मीटर असून, झाडाची उंची सुमारे ५० ते ६० फूट आहे. फांद्यांचा घेरही मोठा आहे.
बुधवारी रात्री अज्ञाताने कटरच्या साहाय्याने या झाडाचा बुंधा कापला आहे. बुंध्याचा पूर्ण घेर जवळपास अडीच ते पाच इंचाने कापला आहे. गुरुवारी सकाळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना याबाबतची माहिती मिळताच मनसेच्या वतीने झाडाखाली निदर्शने करण्यात आली.
यावेळी मनसेचे तालुका प्रमुख दादा शिंगण, शहर प्रमुख सागर बर्गे, विद्यार्थी सेनेचे जिल्हाप्रमुख विनायक भोसले, मराठा महासंघाचे अनिल घराळ, महेश पाटील, भाजपच्या सीमा घार्गे, मंजिरी कुलकर्णी, संभाजी चव्हाण, योगेश जाधव, शंभू पिसे, श्रेयश इनामदार व कार्यकर्ते उपस्थित होते.
याबाबतची माहिती मिळताच एनव्हायरो फ्रेंड्स नेचर क्लबचे अध्यक्ष प्रा. जालिंदर काशीद, चंद्रकांत जाधव, ए. आर पवार, पालिकेचे वृक्ष अधिकारी व नगर अभियंता सुधीर चव्हाण, सहाय्यक उद्यान पर्यवेक्षक मुजफ्फर नदाफ, पोलिस उपनिरीक्षक निखिल मगदूम यांनी घटनास्थळी भेट देऊन झाडाची पाहणी केली. पालिकेच्या वतीने बुंधा कापलेल्या झाडाचा पंचनामा करण्यात आला आहे. पालिकेकडून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सुधीर चव्हाण यांनी सांगितले. सीसीटीव्हीच्या मदतीने बुंधा कापणाऱ्याचा शोध घेतला जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.