कराड प्रतिनिधी । कराड शहरासह तालुक्यातील दुकानांवरील इंग्रजी फलक काढुन त्या ठिकाणी मराठा फलक लावावेत अन्यथा खळखट्याक आंदोलन करून असा इशारा काही दिवसांपूर्वी मनसेच्या कराड येथील पदाधिकाऱ्यांनी दिला होता. मात्र, याकडे दुकानदारांकडून दुर्लक्ष केले जात असल्याचे लक्षात आल्यानंतर आज कराड येथील कोल्हापूर नाक्यावरील एका दुकानावरील इंग्रजी फलक मनसेचे तालुका प्रमुख दादासाहेब शिंगण यांच्या नेतृत्वाखाली हटवून खळखट्याक आंदोलन करण्यात आले.
कराड शहराच्याप्रवेश द्वारावर कोल्हापुर नाका नजीक असलेल्या एका ऑफिसचा इंग्रजी फलक मनसे तालुका प्रमुख दादा शिंगण यांनी फाडून टाकला. प्रशासन व दुकानदारांनी तत्काळ कार्यवाही करून मराठी पाटया लावाव्यात अन्यथा हा फक्त ट्रेलर आहे काही दिवसांत मनसे पिक्चर दाखवेल, असा इशारा शिंगण यांनी यावेळी दिला.
मनसेच्या वतीने मराठा पाट्याचे आंदोलन सुरू केल्यानंतर न्यायलयानेही महाराष्ट्रातील सर्व दुकाने व आस्थापनांना प्रथम मराठी भाषेत फलक असावा, असे निर्देश दिले आहेत. असे असतानाही अनेक दुकानांना केवळ इंग्रजी भाषेतच फलक आहेत. त्यामुळे काही दिवसांपूर्वी कराड शहर व तालुका मनसेच्या वतीने तहसिलदारांना निवेदन देत इंग्रजी पाटयांवर कारवाई करून मराठीत पाटया लावण्याची मागणी केली होती.
मनसेच्या दादासाहेब शिंगण यांनी कोल्हापुर नाका नजीक असलेल्या एका ऑफिसचा इंग्रजी फलक फाडल्यानंतर पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मनसेच्या वतीने प्रथम प्रशासनाला निवेदन देऊन मराठी पाटया लावण्याबाबत कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली होती. तर दुकानदारांनाही मराठी पाटया लाऊन महाराष्ट्राची अस्मिती जपण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, अध्याप कराड व मलकापूर शहरातील अनेक दुकानदारांनी इंग्रजी पाटया बदललेल्या नाहीत. त्यामुळे आज एका ऑफिसचा इंग्रजी फलक फाडण्यात आला आहे.
.