सातारा प्रतिनिधी | सातारा शहरातील विद्यालय, महाविद्यालयात महाराष्ट्राचे राज्य गीत ‘जय जय महाराष्ट्र माझा” हे गीत लावण्यात यावे यासाठी सातारा मनसे कडून जिल्हा प्रशासनाला मनसे शहराध्यक्ष राहुल पवार यांनी निवेदन दिले आहे.
राज्य सरकारकडून १ फेब्रुवारी २०२३ रोजी ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या गीताला राज्यगीताचा दर्जा देण्यात आला, त्या नंतर राज्यातील सर्व विद्यालय, महाविद्यालयात तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमात हे गीत वाजवण्यात यावे असे राज्य सरकार कडून जाहीर करण्यात आले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १५ मार्च २०२४ रोजी शासनाचे परिपत्रक काढून या संदर्भातील औपचारिक पालन करण्यासाठी मार्गदर्शक सूचना दिल्या गेल्या.
यामध्ये प्रत्येक शाळेत दैनिक सत्र सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत, परिपाठ, प्रार्थना, प्रतिज्ञा सोबतच आपले राज्यगीत लावण्यात यावे अशी सूचना करण्यात आली. ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे गीत महाराष्ट्र सरकारने स्वीकारून एक वर्ष उलटल्यानंतर देखील या गीताला याचा उच्चीत सन्मान मिळत नव्हता असे निदर्शनास आल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे तसेच महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी १४ फेब्रुवारी २०२४ रोजी मुख्यमंत्री शिंदे यांना ही गोष्ट निदर्शनास आणून दिली आणि प्रत्येक शाळा, महाविद्यालयात आपले राज्यगीत लावण्यात यावे तसेच गायले जावे अशी आग्रही मागणी केली.
या पत्राची सकारात्मक दाखल शासन दरबारी घेतली गेली व पत्राच्या ३ दिवसांतच राज्य शासनाने परिपत्रक काढले. सातारा शहरामध्ये सर्व शाळा व महाविद्यालयात राज्यगीत गायले व लावले पाहिजे. यासाठी लक्ष घालून संबंधित शिक्षण अधिकारी यांना आदेश करून शिक्षण संस्थांमध्ये राज्यगीत गायले व वाजले जात आहे की नाही याबाबत खात्री करावी. यात कसूर करणाऱ्या अधिकारी व आदेशाचे पालन न करणाऱ्या शिक्षण संस्थेवर कडक कारवाई करण्यात यावी, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना मराठी भाषेच्या अस्मितेसाठी आक्रमक आंदोलन करेल.
यावेळी सातारा मनसेचे शहर अध्यक्ष राहुल पवार, शहर उपाध्यक्ष भरत रावळ, वैभव वेळापुरे, अझर शेख, विभाग अध्यक्ष गणेश पवार, प्रशांत सोडमिसे, शाखा अध्यक्ष ओंकार साळुंखे, किरण गायकवाड, विधी सल्लागार ऍड. मुश्ताक भोरी, जनहित अधिकार शहर अध्यक्ष संदीप धुंदळे व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.