लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील 6 विधानसभा मतदारसंघात ‘या’ आमदारांची झाली सत्वपरीक्षा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | नुकत्याच झालेल्या सातारा लोकसभा निवडणूक 2024 मध्ये उदयनराजे भोसले यांनी ३२ हजार ७७१ मतांनी शशिकांत शिंदे यांचा पराभव केला. या घटलेल्या मताधिक्यामुळे 6 विधानसभा मतदारसंघात जणू आमदारांची सत्वपरीक्षा झाली आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारा लोकसभा मतदारसंघाच्या अटीतटीच्या लढतीत संघर्षमय विजय अखेरच्या दहा फेऱ्यांमध्ये मिळवला आहे.

उदयनराजे भोसले यांच्या विजयामध्ये सातारा, कोरेगाव, कराड दक्षिण या तीन मतदारसंघाने हात दिला. सातारा जावली विधानसभा मतदारसंघातून उदयनराजे यांना ३६ हजाराचे मताधिक्य मिळाले. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पक्षनिष्ठा आणि बंधुप्रेम या दोन्ही पातळ्यांवर शंभर टक्के काम केले. शशिकांत शिंदे मूळचे जावलीचे असल्यामुळे त्यांनाही येथील मतदानाचा फायदा झाला, मात्र सातारा मतदारसंघाने दिलेले मताधिक्य उदयनराजे यांच्यासाठी निर्णायक आघाडीसाठी महत्त्वाचे ठरले.

शशिकांत शिंदे यांना विशेषतः सातारा शहरातून विशेष मदत मिळाली नाही. वाई मतदारसंघांत आमदार मकरंद पाटील यांनी शेवटच्या टप्प्यामध्ये जी वातावरण निर्मिती केली ती अत्यंत पूरक ठरली. येथून उदयनराजे यांना साडेसहा हजार मताचे मताधिक्य मिळाले. मात्र हे मताधिक्य अपेक्षित असे मिळाले नाही. माजी आमदार मदन भोसले उदयनराजे यांच्या गटाकडून होते. शरद पवार गटाचा एकही मोठा नेता या मतदारसंघात नव्हता. शशिकांत शिंदे यांचे या मतदारसंघात प्रयत्न कमी पडले.

उदयनराजे मतदारसंघात पहिल्या टप्प्यात पिछाडीवर होते, मात्र शेवटच्या टप्प्यात जे मताधिक्य मिळाले त्यामध्ये वाई मतदारसंघातील शेवटच्या फेऱ्यांचाही समावेश होता. अजित पवारांच्या सभेनंतर वाईमध्ये वातावरण निर्मिती झाली. त्यात मकरंद पाटील गट सक्रिय झाला. त्यामुळे शिंदेंना तेथून धोबीपछाड देण्यात उदयनराजे यांना यश आले.