सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील आठही मतदारसंघांत सध्या विद्यमान आमदारांसह इच्छुकांनी मतदरा संघात विकासकामांचे भूमिपूजन, लग्न, छोटे मोठे कार्यक्रम तसेच नवरात्रोत्सव मंडळाच्या गाठीभेटींवर चांगलाच जोर लावला आहे. अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून त्याच्याकडून संपर्क वाढवीत ‘मत फक्त आपल्यालाच’ आवाहन केले जात आहे. तर राजकीय पुढाऱ्याप्रमाणे इकडे प्रशासन देखील निवडणुकीच्या कामाला लागले आहे. या पार्श्वभूमीवर अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यात एकूण २६ लाख १७ हजार ७४५ मतदार असून, यात ४० ते ४९ वयोगटांतील तब्बल २० टक्के म्हणजेच ५ लाख ४५ हजार ५५८ मतदार आहेत. त्यामुळे आमदार ठरवण्यात चाळिशीतील मतदारांचा मोठा वाटा राहणार आहे.
जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांतील अनेक इच्छुक लोकसभा निकालाचा अंदाज घेऊन सध्या कामाला लागले आहेत. त्यामुळे काहींनी मुंबईत तर काहींनी बारामतीकडे संपर्क वाढविला आहे. एकीकडे राजकीय पक्षांनी विधानसभेसाठी मोर्चेबांधणी सुरू केली असताना प्रशासनानेही तालुका निहायक निवडणूक अधिकार, बीएलओच्या बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. निवडणूक प्रशासनाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अंतिम यादीनुसार जिल्ह्यात ३० ते ३९ आणि ४० ते ४९ वयोगटांतीलच मतदार सर्वाधिक आहेत.
कोणत्या वयोगटाचे किती मतदार?
१८-१९ वयोगटात ६०९३६ मतदार
२०-२९ वयोगटात ४७२३३५ मतदार
३०-३९ वयोगटात ५४२९०४ मतदार
४०-४९ वयोगटात ५४५५५८ मतदार
५०-५९ वयोगटात ४४३५५० मतदार
६०-६९ वयोगटात ३०१२६४ मतदार
७०-७९ वयोगटात १७२०७१ मतदार
८०-८९ वयोगटात ७८९२७ मतदार
एकूण : २६१७७४५
सर्वाधिक मतदार चाळिशीतील
वयोगटानुसार आकडेवारी पाहता चाळिशीतील मतदार ५ लाख ४५ हजार ५५८ इतके आहेत. हे प्रमाण २०.८४ टक्के इतके आहे. हे प्रमाण पाहता आगामी विधानसभांमध्ये या वयोगटातील मतदान निर्णायक ठरणार आहे. याबरोबरच ३० ते ३९ वयोगटांतील मतदानही ५ लाख ४२ हजार ९०४ इतके म्हणजेच २०.७४ टक्के आहे. त्यामुळे या वयोगटातील मतदारांसमवेत नेतेमंडळीना संपर्क वाढवावा लागणार आहे.
सर्वात कमी मतदार ८० हून अधिक वयोगटाचे
सर्वांत कमी मतदार ८० व त्याहून अधिक वयोगट असणारे ७८ हजार ९२७ मतदार आहेत. ही संख्या कमी असली तरी ज्याठिकाणी तुल्यबळ लढती होणार आहेत, त्याठिकाणी हे मतदान दुर्लक्षून चालणार नाही.
नवमतदारांमध्ये ८०७१ इतकी वाढ
१८ ते १९ या वयोगटामधील मतदारांची संख्या ८०७१ ने वाढली आहे. या वयोगटातील मतदार आता ६०,९३६ आहेत. तसेच २० ते २९ या वयोगटांत मतदारांची संख्या ४,७२,५३५ आहे.