सातारा प्रतिनिधी । उन्हाळा जवळ आल्या सध्या पाण्याची कमतरता जास्त भासू लागली आहे. अशांत सांगली जिल्ह्यातील हजारो हेक्टर क्षेत्राला पाणी टंचाईच्या झळा बसू लागलेल्या आहेत. या भागातील टंचाई निवारणासाठी तारळी धरणातून पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी आमदार सुमनताई आर. आर. पाटील, आमदार मानसिंग नाईक आणि आमदार अरुण लाड यांनी केली आहे. यासंदर्भात या आमदारांनी काल सोमवारी जिल्हाधिकारी एम. राजा दयानिधी यांची भेट घेत त्यांना मागणीचे निवेदन दिले.
आमदारांनी जिल्हाधिका-यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यामध्ये कृष्णा नदीवर खोडशी बंधारा आहे. खोडशी बंधाऱ्याचे लाभक्षेत्र सातारा जिल्ह्यातील कराड तर सांगली जिल्ह्यातील वाळवा, पलूस आणि तासगांव तालुक्यातील आहे.
या माध्यमातून जिल्ह्यातील जवळपास १३.५ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. तसेच पिण्याच्या पाण्याच्या योजना आहेत. उच्च न्यायालयाच्या सन २००४ मधील आदेश नुसार या कालव्याकरीता खोडशी बंधाऱ्यावरील सातारा जिल्ह्यात असणाऱ्या प्रकल्पामधून वार्षिक २.७० टीएमसी एवढे पाणी सिंचनासाठी उपलब्ध करुन देणे बंधनकारक आहे.
यावर्षी कृष्णा नदीतील उपलब्ध पाण्यामधुन खरीप व रब्बी मधील आवर्तन जेमतेम करण्यात आलेले आहे. सध्याच्या उन्हाळी हंगामामध्ये या चार तालुक्यातील लाभक्षेत्रात टंचाई असल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा तुटवडा निर्माण झालेला आहे. तरी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाचा प्रमुख या नात्याने आपण सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्याशी समन्वय साधावा आणि तारळी धरणातून टंचाई अंतर्गत सोडणेबाबत नियोजन करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.