सातारा प्रतिनिधी । आजपर्यंत मराठा समाजात अनेक मोठे नेते झाले. पण, समाज मोठा असल्याने त्याचा केवळ राजकीय कारणांसाठी वापर झाला. त्यामुळे हा समाज मागे पडायला लागला आहे. त्यामुळे मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळावे”, अशी आक्रमक भूमिका सातारा जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मांडली.
नागपूर विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणावरुन सध्या चर्चा सुरु झाली असून मंगळवारी सातारा, जावळीचे भाजपचे आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आक्रमक होत आपली भूमिका मांडली. यावेळी ते म्हणाले की, “मराठा समाज हा गावगाड्यातील प्रमुख समाज असून या समाजाने आजपर्यंत जबाबदारीची भूमिका बजावण्याचे काम केले. इतिहास पाहता या समाजाने हा संरक्षण करण्याचे काम केले असून लढवय्या समाज म्हणून या समाजाची ओळख आहे. मराठा समाजातील व्यक्ती आर्थिक दृष्ट्या संपन्न आहे, त्यांच्याकडे जमीन आहे.
तो श्रीमंत आहे, असे या समाजाकडे पाहिले जात आहे. खरच ही परिस्थिती आहे का, या समाजाची नेमकी परिस्थिती विचारात घेणे गरजेचे आहे. जो समाज रक्षणासाठी लढला. त्याची चुनूक पानिपतचा इतिहास व छत्रपतींच्या इतिहासात पहायला मिळते. यातूनच या समाजाचे कर्तृत्व पहायला मिळते. कोपर्डीच्या घटनेमध्ये आपल्या आई बहिणींचे संरक्षण हा समाज करु शकला नाही. आजपर्यंत या समाजाचे मोर्चे अतिशय शांतते निघाले कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. अशा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. समाजाकडे शेती असली तरी शेतीतून उत्पन्न किती मिळते हे आपण सर्वजण जानता. घरातील विभागण्यावरुन जमिनीचे तुकडे होत आहेत, त्यामुळे अल्प प्रमाणात शेती राहिली आहे.
मराठा समाजात अनेक मोठे नेते झाले पण, समाज मोठा असल्याने त्याचा केवळ राजकीय कारणांसाठी वापर झाला. त्यामुळे हा समाज मागे पडायला लागला आहे. मेडिकल इंजिनिअरिंगच्या शिक्षणात या समाजाची मुले मागे पडत आहेत. माझी या प्रस्तावाच्या माध्यमातून सरकारला विनंती आहे, मराठा समाजाला हक्काचे व टिकणारे आरक्षण मिळावे. तसेच ते समाजातील गरजूंना मिळावे. कोणाचेही काढून न घेता इतरांच्या आरक्षणाला धक्का न लावता मिळावे, जेणे करुन ते पुढे कायद्याने टिकावे”, अशी अपेक्षा आमदार भोसले यांनी मांडली.
आरक्षण का व कुणामुळे गेलं? हे जनतेपुढे आले पाहिजे
आज मराठा समाजाकडून आरक्षणाची मागणी होत आहे. ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, त्यावेळी मोर्चे निघाले सर्व संविधानिक बाजू बघून त्यावेळी टिकावू व कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण दिले. उच्च न्यायालयात आरक्षण टिकलेही. पण नंतरच्या काळात हे आरक्षण का गेले, कसे गेले, कुणामुळे गेलं हे सर्व महाराष्ट्रातील जनतेपुढे आले पाहिजे, असे शिवेंद्रसिहराजे यांनी म्हंटले.
अधिवेशनात केली ‘ही’ महत्वाची मागणी
“या प्रस्तावाच्या माध्यमातून मी मागणी करतो की, आरक्षणामुळे राज्यातील सामाजिक वातावरण ढवळून निघाले आहे. सध्या एक समाज दुसऱ्या समाजाकडे वेगळ्या नजरेने बघत असताना आपले कोणी काढून नेत नाही ना, आपल्यावर अन्याय होणार नाही ना, अशा पद्धतीने पाहिले जात आहे. शासनानेही या समाजाला न्याय देण्याची भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्री शिंदेंनी तर मराठा समाजाला आरक्षण देण्याची शपथ घेतली आहे. त्यामुळे हे आरक्षण मिळेल याची खात्री आहे. केवळ हे सरकारच आरक्षण देऊ शकेल, अशी महत्वाची मागणी शिवेंद्रसिहराजे यांनी केली.