सातारा प्रतिनिधी । छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघनख्यांनी अफझलखानाचा कोथळा बाहेर काढला याची इतिहासात नोंद आहे. त्यांच्या व्यतिरिक्त अन्य कुठल्याच राजाची अशी नोंद कुठेही आढळून येत नाही. याचाही कुठेतरी विचार करायला हवा. जो काही चुकीचा इतिहास पसरवला जातोय तो थांबविण्यासाठी श्री रामदासस्वामी संस्थान व आपल्या सर्वांच्या माध्यमातून प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा भाजप आमदार शिवेंद्रराजे यांनी व्यक्त केली.
सातारा येथील सज्जनगडवरती रामदासी मठपती, संपर्क कार्यालय प्रमुख आणि कार्यकर्ते यांच्या वतीने नुकतेच वार्षिक विचारमंथन संमेलन घेण्यात आले. यावेळी आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी उपस्थिती लावली होती.
यावेळी आ. भोसले म्हणाले की, ‘जगात मोठमोठे राजे होऊन गेले. आपण ब्रिटिश राजवटदेखील पाहिली; परंतु छत्रपती शिवाजी महाराज वगळून अन्य कोणत्या राजाने वाघनखांनी कोथळा काढला, कोणाचा वध केला, याची कुठेही नोंद आढळत नाही. ऐतिहासिक महत्त्व आहे म्हणूनच ‘ती’ वाघनखे इंग्लंडच्या संग्रहालयात ठेवण्यात आली आहेत. ती माझी आहेत अथवा मी बनवून दिली आहेत म्हणून ठेवली गेलेली नाहीत.
‘जर मी म्हटलो माझा पेन संग्रहालयात ठेवायचा आहे, तर लोक तुमचा काय संबंध म्हणून मला विचारणा करतील; पण जर का माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा पेन संग्रहालयात ठेवला तर तो पाहण्यासाठी निश्चितच लोक येतील. ज्यांचे कार्यकर्तृत्व मोठे आहे, अशाच व्यक्तींच्या वस्तू संग्रहालयात ठेवल्या जातात. मात्र, अलीकडे वाघनखांवरून प्रचंड राजकारण सुरू आहे. तरुणांपुढे चुकीचा इतिहास मांडला जातोय, असे आ. भोसले यांनी म्हंटले.