छ. शिवाजी महाराजांची लंडनमधील वाघ नखे खोटी हे सिध्द करून दाखवा; साताऱ्यात शिवेंद्रराजेंचे विरोधकांना आव्हान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्या वाघनखांनी अफझलखानाचा कोथळा काढला. त्यासारखी व त्यावेळची वाघनखं महाराष्ट्राच्या जनतेला पुन्हा पाहायला मिळणार आहेत. लंडनच्या व्हिक्टोरिया म्युझियममधून वाघनखं महाराष्ट्रात आणली जाणार आहेत, परंतु ती वाघनखं महाराष्ट्रात येण्याअगोदरच त्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी ही वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरले आहेत का? असा सवाल करीत त्यावर त्यांनी आक्षेप घेतला असल्याने यावर साताऱ्याचे भाजप आमदार छत्रपती शिवेंद्रसिहराजे भोसले यांनी थेट आव्हान दिले आहे. छ. शिवाजी महाराजांची लंडनमधील वाघ नखे ही खरी आहेत का खोटी हे सिध्द करून दाखवा, असे शिवेंद्रराजेंनी म्हंटले आहे.

महात्मा गांधी जयंती निमित्त आज साताऱ्यातील शिवतीर्थावर भाजप आमदार छ. शिवेंद्रराजे भोसले यांनी स्वच्छता मोहिमेत सहभागी होत स्वच्छता केली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघ नखांबाबत करण्यात आलेल्या आरोपांवर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, विरोधकांनी वाघ नखांबाबत केलेला प्रश्न यामध्ये राजकारण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, सुधीर मुनगंटीवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नातून जी वाघ नखे लंडनमध्ये होती, ती भारतात येत आहेत.

विरोधक म्हणतायेत ही वाघ नखे खरी आहेत का? तर माझा त्यांना उलट सवाल आहे ती खोटी आहेत का? हे सिद्ध करा अशा पद्धतीने ज्या गोष्टीं सोबत मराठी माणसाची अस्मिता जोडली गेलेली आहे. आदित्य ठाकरे यांनी मुंबईत येवून वाघनखांच स्वागत, पूजन करावे, अशी मी विनंती करतो.छ. शिवाजी महाराज यांची वाघनखं साताऱ्यात आणण्यात येणार असून तेव्हा मिरवणूक काढली जाईल. यावेळी शिवतीर्थावर वाघनखं आणून त्याची विधीवत पूजा करण्यात येणार आहे. छ. शिवाजी महाराजांना हार अर्पण केला जाईल. तेथेही सातारकर तसेच महाराष्ट्रातील लोकांनी येवून दर्शन घ्यावे, असे आवाहन शिवेंद्रराजे भोसले यांनी यावेळी केले.