महामार्गाचा ठेकेदार कोणाचा जावई आहे काय…; दुरवस्थेवरून आ. शशिकांत शिंदेंचा संताप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | गेल्या काही दिवसांत पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. यावरून दिशा समितीच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार श्रीनिवास पाटील व आमदार शशिकांत शिंदे यांनी अधिकाऱ्यांवर चांगलाच संताप व्यक्त केला. महामार्गाचा ठेकेदार कोणाचा जावई आहे की काय? जिल्ह्यातील जनतेने फक्त टोलचे पैसेच भरत बसायचे का? यापुढे जर सोयीसुविधा मिळणार नसतील, तर टोल नाके बंद पाडले जातील?, असा थेट इशारा आ.शिंदे यांनी दिला.

सातारा जिल्हा परिषदेच्या सभागृहात दिशा समितीची बैठक खासदार श्रीनिवास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. यावेळी आ. शशिकांत शिंदे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक संतोष हराळे यांच्यासह समितीचे सदस्य व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

सातारा-लोणंद रस्त्याबाबत प्रश्न उपस्थित होताच आमदार शिंदे चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी भर सभागृहात ”महामार्गाचा ठेकेदार कोणाचा जावई आहे की काय? जिल्ह्यातील जनतेने फक्त टोलचे पैसेच भरत बसायचे का?”, असा सवाल केला. यावर जितेंद्र डुडी यांनी महामार्गाबाबत असलेल्या तक्रारींवरून नाराजी व्यक्त केली. बैठकीत चर्चा होतात. मात्र, त्यावर महामार्ग प्राधिकरण पुढे काही करत नाही. ही बाब गंभीर असून, यापुढे असे खपवून घेतले जाणार नाही. महामार्गावरील वाढते अपघात कमी करण्यासाठी महामार्ग प्राधिकरणाने उपाययोजना करावी, अशा सूचना डुडी यांनी दिल्या.