शरद पवारांचे निष्ठावंत आमदार शशिकांत शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष

0
435
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । गेल्या अनेक दिवसांपासून जयंत पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या राजीनाम्याची चर्चा सुरु होती. स्वतः जयंत पाटील यांनीच आपल्याला पदावरून निवृत्त करावे, अशी इच्छा व्यक्त केली होती. अखेर या चर्चेला पूर्ण विराम मिळाले असून जयंत पाटील यांनी आज प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि अवघ्या काही वेळेत खासदार शरद पवार यांचे निष्ठावंत असलेल्या विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांची पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील हुमगाव येथील असलेल्या विधान परिषदेचे आमदार व शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शशिकांत शिंदे हे 15 जुलै रोजी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारणार आहेत. माथाडी कामगारांचे प्रभावी नेते म्हणून ओळख असलेल्या शिंदे यांचा जन्म 19 ऑक्टोबर 1963 रोजी झाला. वडील जयवंतराव शिंदे आणि आई कौसल्या शिंदे यांच्या सुसंस्कृत आणि प्रेमळ वातावरणात त्यांचे बालपण गेले. लहान वयातच समाजकारण आणि राजकारणात ते सक्रिय झाले.

जयंत पाटील राजीनाम्याबाबत काय म्हणाले होते?

मला प्रदेशाध्यक्षपदातून मुक्त करा अशी मागणी जयंत पाटील यांनी 10 जून रोजी झालेल्या पक्षाच्या वर्धापन दिनीच केली होती. मला पवार साहेबांनी बरीच संधी दिली. सात वर्षाचा कालावधी दिला. शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणे आवश्यक आहे. तुम्हा सर्वांदेखत साहेबांना विनंती करेन, शेवटी पक्ष पवार साहेबांचा आहे. शरद पवारांनी यावर योग्य निर्णय घ्यावा. आपल्याला बरेच पुढे जायचे आहे, असं जयंत पाटील म्हणाले होते. त्यानंतर आज जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतला.

जयंतराव अन् अजितदादांची कराडात झाली होती ‘चाय पे चर्चा’

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांमध्ये देखील पक्षांतराची चर्चा केली जात असताना कराड तालुक्यातील यशवंतनगर येथील सह्याद्री सहकारी साखर कारखान्यावर शुक्रवारी पार पडलेल्या एका लग्न सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे खा.शरद पवार यांची भाजपचे खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी भेट घेतली. गेल्यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीतील प्रतिस्पर्धी आ. शशिकांत शिंदे यांच्याशीही खा. उदयनराजेंनी गप्पा मारल्या. तर दुसरीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात अर्धा तास चाय पे चर्चा झाली. त्यानंतर आज जयंत पाटील यांनी प्रत्यक्ष प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. अजित पवारांशी चर्चा झाल्यानंतर जयंत पाटलांनी राजीनामा दिल्यामुळे यांची राजकीय वर्तृकात चर्चा सुरु झाली आहे.

शशिकांत शिंदेंची अशी आहे राजकीय कारकीर्द

1999 साली शशिकांत शिंदे यांनी प्रथम जावळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि 12,000 मतांच्या फरकाने विजय मिळवला. त्यांनी महाराष्ट्र राज्याच्या कृष्णा खोरे पाटबंधारे महामंडळाचे जलसंपदामंत्री म्हणून काम पाहिले आहे. 2009 ते 2014 या कालावधीत त्यांनी कोरेगाव मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार म्हणून काम केले. या निवडणुकीत त्यांनी शालिनीताई पाटील यांचा पराभव केला होता. शशिकांत शिंदे हे दोन पंचवार्षिक जावळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहिले असून त्यानंतर दोन पंचवार्षिक कालावधीसाठी कोरेगावचे आमदारही होते. मात्र, 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांचा पराभव महेश शिंदे यांनी केला. त्यानंतर शिंदे यांनी सातारा लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या वतीने, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून भाजपच्या महायुतीचे उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती, मात्र त्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. 2024 ची विधानसभेची निवडणुक देखील शशिकांत शिंदेंनी लढवली. मात्र पुन्हा शिवसेना शिंदे गटाच्या महेश शिंदे यांनी त्यांचा पराभव केला. सध्या शशिकांत शिंदे हे विधान परिषद आमदार आणि शरद पवार गटाचे मुख्य प्रतोद आहेत.