‘आम्ही लोकसभेची निवडणूक ‘या’ चार मुद्यांवर लढणार…’; साताऱ्यात पृथ्वीराज बाबांचे महत्वाचे विधान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीबाबत चर्चा आणि रणनीती ठरवण्यासाठी महाविकास आघाडीतील घटक पक्षांची आणि निमंत्रित प्रतिनिधींच्या उपस्थितीत आज सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी येथे महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर भाजप आणि मनुवादी व्यवस्थेच्या विरोधात एकत्र आलो आहे. महाराष्ट्रात विजयाची खात्री नसल्यानेच त्यांच्याकडून फोडाफोडीचे राजकारण सुरू असल्यामुळे तीन पक्षांच्या बैठकीत उमेदवार ठरेल त्याला विजयी करणार आहे. यासाठी योग्यवेळी जागांची आणि उमेदवारांचीही घोषणा होईल, असे महत्वाचे विधान माजी मुख्यमंत्री पृश्वीराज चव्हाण यांनी केले.

साताऱ्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज महत्वाची बैठक पार पडली. यानंतर माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, माजीमंत्री बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे, सतेज पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते प्रा. नितीन बानुगडे – पाटील, श्रमिक मुक्ती दलाचे डाॅ. भारत पाटणकर, लक्ष्मण माने, अॅड. वर्षा देशपांडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डाॅ. सुरेश जाधव, सरचिटणीस नरेश देसाई, काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा अल्पना यादव, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सरचिटणीस राजकुमार पाटील, उदयसिंह पाटील, रणजितसिंह देशमुख आदी उपस्थित होते.

लोकशाही संपुष्टात आणून विरोधी पक्षांनाही संपविण्याचे काम सुरू : पृथ्वीराज चव्हाण

यावेळी माजी मुख्यमंत्री पृश्वीराज चव्हाण म्हणाले, आताच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने ३७० पार खासदाराचा नारा दिला आहे. याचा अर्थ संविधान बदलण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर लोकशाही संपुष्टात आणून विरोधी पक्षांनाही संपविण्याचे काम सुरू आहे. महाराष्ट्रा त तर मराठा समाज आणि ओबीसीत भांडणे लावली आहेत. हे सर्व मनुवादी कारस्थान आहे. या निवडणुकीत विजयाची खात्री नसल्यानेच त्यांच्याकडून पक्ष फोडण्याचे काम सुरू आहे. देशातील लाेकशाही आणि संविधान टिकवण्यासाठी लोकांनीच ही निवडणूक हाती घेण्याची गरज आहे. त्याचबरोबर या निवडणुकीत वंचित आघाडीलाही बरोबर घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

यशवंतराव चव्हाण यांचे विचार बदलू देणार नाही : शशिकांत शिंदे

माजी मंत्री शशिकांत शिंदे म्हणाले, ३ फेब्रुवारीला महाविकास आघाडीची बैठक राष्ट्रवादी भवनमध्ये झाली. त्यानंतर काँग्रेस कमिटीत ही बैठक पार पडली. इंडिया आघाडी मजबूत असून सर्वांत भाजपविरोधात लढण्याची जिद्द आहे. महाराष्ट्रा चे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांचा वारसा आणि त्यांचे विचार बदलण्याचा प्रयत्न होत आहे. पण, आम्ही तसे होऊ देणार नाही. यशवंतराव चव्हाण यांचे विचार जीवंत ठेवण्याची भूमिका आम्ही घेतली आहे. यासाठीच ही बैठक झाली. साताऱ्यात ३८ पक्ष आणि संघटना एकत्र आल्या असून आम्ही आता विजयी होऊनच दाखवू. प्रा. बानुगडे पाटील यांनीही भाजपवर ताेंडसुख घेतले. तसेच २०२४ ची निवडणूक भारताची दिशा ठरवणारी आणि संविधान वाचविणारी आहे. ही निवडणूक स्वातंत्र्यांची दुसरी लढाई आहे. यासाठी आम्ही सर्वजण एकत्र निवडणूक लढवतोय, असेही त्यांनी स्पष्ट केले.