कराड प्रतिनिधी । मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र 1960 साली अस्तित्वात आला. पण त्याआधी 1953 साली महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचे विधेयक स्व. यशवंतराव भाऊंनी सर्वप्रथम मांडले व त्यावर ऐतिहासिक भाषण केले. महाराष्ट्राची राजधानी मुंबईच असावी, हा आग्रह त्यांनी केला होता. काँग्रेसमध्ये असूनही स्व. भाऊसाहेब हिरे यांनीे शेकाप आमदार असलेल्या भाऊंच्या भाषणाला पाठिंबा दिला होता, अशी आठवण आज यशवंतराव मोहिते यांच्या स्मृतिदिनानिमित्त माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितली.
माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी आज स्व. यशवंतराव भाऊ यांच्या रेठरे बुद्रुक येथील निवासस्थानी भेट दिली व भाऊंना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी भाऊंचे सुपुत्र डॉ. इंद्रजित मोहिते, सोनहिरा सह साखर कारखान्याचे संचालक रघुनाथराव कदम, नरेंद्र पाटील, नितीन थोरात, सनी मोहिते, दिग्विजय सूर्यवंशी, इंद्रजित चव्हाण, देवदास माने, राम मोहिते, बाबुराव मोटे, अशोकराव पाटील, वाठारचे जयवंत पाटील, बबन सुतार, आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, महाराष्ट्र हे राज्यातील आघाडीचे राज्य म्हणून ओळखले जाते. राज्याच्या उभारणीत स्व. यशवंतराव मोहिते तसेच अनेक राज्यकर्त्यांनी अत्यंत निष्ठेने आणि तळमळीने काम केले. राज्याच्या बासष्ट वर्षांच्या वाटचालीत जे विकासाचे टप्पे आहेत त्यात आर्थिक, सामाजिक, सहकाराच्या विकासात स्व. भाऊंचे योगदान मोलाचे आहे. ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासासाठी आपले समाजवादी विचार त्यांनी सर्वसामान्यांच्या हितासाठी वापरले. स्व. भाऊंची विधिमंडळातील भाषणे अभ्यासली तर त्यांची तळागाळातील जनतेबद्दलची बांधिलकी त्यांच्यातील विचारवंत आपल्याला ठायीठायी जाणवतो. ही भाषणं आणि त्याला मंत्री म्हणून पूरक कृती आजच्या पिढीला दिशादर्शक ठरतील.