कराड प्रतिनिधी । जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाचे समाज माध्यमावर एक पत्र फिरत आहे की, कंत्राटी पद्धतीने तहसीलदार नेमणे आहेत. ही जर बातमी खरी असेल तर कशा पद्धतीने सरकार चालत आहे? हा अत्यंत दुर्भाग्यपूर्ण निर्णय असू शकेल. तसेच खाजगी 10 कंपन्यांच्या मार्फत 70 हजार नोकर भरती करण्याचे सरकारने जीआर काढलेला आहे, हा जीआर सर्वत्र उपलब्ध आहे. सरकारचा हा जो कारभार चालू आहे तो अत्यंत चुकीच्या पद्धतीने सुरू आहे. या विरोधात सर्वांनी एकत्र उठाव करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
कराड तालुक्यातील सवादे येथे आ. चव्हाण यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या 3 कोटी 36 लाख रुपयांच्या विविध विकासकामांच्या भूमिपूजन व उदघाट्न प्रसंगी कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस उदयसिंह पाटील, अजितराव पाटील, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, कराड दक्षिण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोहर शिंदे, प्रा. धनाजी काटकर, माजी जि प सदस्य शंकरराव खबाले, नरेंद्र पाटील, नानासाहेब पाटील, बंडानाना जगताप, इंद्रजित चव्हाण, धनाजी थोरात, मुंबई प्रदेश काँग्रेसचे सचिव बाळासाहेब थोरात, उद्योजक वसंतराव चव्हाण, सोसायटी चेअरमन बाजीराव थोरात, कराड दक्षिण काँग्रेसचे उपाध्यक्ष नितीन थोरात, सवादेच्या सरपंच जयश्री कदम, माजी सरपंच लक्ष्मी सुतार, माजी उपसरपंच पुजाराणी थोरात आदिसह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, नेहरूनी – इंदिरा गांधींनी लोकशाहीचा पाया भक्कम केला होता. सरकारी संस्था उभ्या करून देश सक्षम केला. इंदिराजींनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले पण तोच आपला देश आज धार्मिक ध्रुवीकरणात अडकला आहे. जे लोक भाजपात गेले ते त्यांचा भ्रष्टाचार धुतला जावा यासाठी गेले. म्हणजे लुटलेला गोरगरीब जनतेचा पैसा सरळ सरळ पचवीण्याचे काम भाजपात गेल्यावर होत आहे. साम दाम दंड भेद चा वापर करून भ्रष्टाचाऱ्यांना पक्षात घेऊन त्यांच्यावरील आरोप धुवून टाकण्याचे राजकारण कुणालाही अपेक्षित नव्हते, इतका कधीही सत्तेचा गैरवापर झाला नाही तो आता केला जात आहे.
यावेळी ॲड. उदयसिंह पाटील म्हणाले की, काकांनी मतदारसंघातील प्रत्येक घटकाचा विचार करीत त्यांना संरक्षण देऊन मतदारसंघ आबाधित ठेवला. या मतदारसंघाने जो विचार जपला तो विचार जपण्याचा प्रयत्न बाबा कसोशीने करत आहेत त्यांना आपण साथ देण्याची गरज आहे. यावेळी सचिन थोरात यांनी प्रास्ताविक केले तर सुरेश साठे यांनी आभार मानले.