कराड प्रतिनिधी | माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून रेठरे बुद्रुक येथील कृष्णा नदीवरील जुन्या पुलाची दुरुस्ती पूर्ण झाली असून आता हा पूल 25 टन वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. या जुन्या पुलाच्या दुरुस्तीसाठी माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून रु. 6 कोटी इतका निधी मंजूर झाला व यामधूनच पुलाची दुरुस्ती करण्यात आली. या पुलाची दुरुस्ती झाल्यानंतर 64 टन मर्यादेची चाचणी घेण्यात आली व त्यानुसार 25 टन इतक्या क्षमतेच्या वाहनांना वाहतुकीसाठी परवानगी देण्यात आली आहे. या जुन्या पुलाची व नवीन पूल बांधणीच्या कामाची माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी पाहणी केल्यानंतर अधिकाऱ्यांनी हि माहिती दिली.
रेठरे बुद्रुक येथे साखर कारखाना असल्याने या कारखान्याला सभासद शेतकऱ्यांच्या उसाची वाहतूक याचं पुलावरून होत असते. अनेक वर्षे सुरु असणारी वाहतूक व काही वेळा पुरामुळे पूल पाण्याखाली गेला असल्याने पूल खचला होता. वाहतुकीसाठी अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या या पुलावरून नियमित वाहतूक होत असल्याने कराड दक्षिण चे विद्यमान आमदार तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून नवीन पूल बांधण्याची गरज लक्षात घेऊन नवीन पूल मंजूर करण्यात आला व त्यासाठी रु. 45 कोटींचा निधी सुद्धा मंजूर झाला. तसेच या नवीन पुलाचे काम सद्या सुरु आहे.
याचसोबत नवीन पूल बांधून होईपर्यंत जुना पूल दुरुस्तीसाठी रु. 6 कोटी इतका निधी आ. चव्हाण यांनी मंजूर केला होता व त्यानुसार जुन्या पुलाचे मजबुतीकरण करण्यात आले असून 64 टन क्षमतेची चाचणी सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतली असून 25 टन क्षमते पर्यंतच्या वाहनांसाठी पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल असा अहवाल अधिकाऱ्यांनी आ. चव्हाण यांना पूल भेटी दरम्यान सादर केला. शेतकऱ्यांचा ऊस रेठरे बु. येथील कारखान्याला जात असतो, त्या सर्व शेतकऱ्यांना या नवीन पूल बांधणी मुळे तसेच जुन्या पुलाच्या दुरुस्तीमुळे याचं पुलावरून ऊस वाहतूक नियमित होणार असून ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा वाहतुकीचा खर्च वाचणार असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.