सातारा प्रतिनिधी | मी तालुक्यात आलो तेव्हाही चांगली गाडी घेऊनच आलो होतो. माझे जे काही आहे ते व्यवसायातून आणि खुल्या किताबाप्रमाणे आहे. मी प्रांत, कलेक्टर, आयुक्त, सचिव आणि पवारांचा चमचा नाही. पवारांनी माझी पाच वेळा चौकशी लावली होती. मात्र, ज्या दिवशी तुमची चौकशी लावू त्यादिवशी तुमची जागा कुठे असेल याचा विचार करा. जयकुमारला डिवचू नका. नादाला तर अजिबात लागू नका. नादाला लागल्यावर कोण कुठे असतो याची माहिती घ्या, असा इशारा भाजप आमदार जयकुमार गोरे यांनी प्रभाकर देशमुख यांना दिला.
दहिवडी येथील भाजप कार्यालयात आमदार जयकुमार गोरे यांनी नुकताच पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला.
यावेळी आ. गोरे म्हणाले,”जनतेने देशमुखांना मागच्या निवडणुकीत घरी बसवले आहे. त्यांनी घरात आनंद घ्यावा. या वयात न झेपणाऱ्या भानगडी करु नयेत. मला अनेक वेळा अडकविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पण ते अडकले तर त्यांना या वयात झेपणार आहे का याचा विचार करावा. मी राजकारणातून काही कमवले नाही. पण कुणी काय आणि कोणत्या उचापती करुन करोडोंची माया कमवलीय ते लवकरच बाहेर येणार आहे. मी आणलेल्या पाण्यावर देशमुखांनी त्यांचा ऊस भिजवायला आतापर्यंत किती वेळा पाणीपट्टी भरली ते एकदा जनतेसमोर जाहीर करावे.”
जयंत पाटलांकडून योजना रखडवण्याचे पाप…
जिहे कठापुरची जी योजना आहे. ती जयंत पाटलांनी रखडवण्याचे पाप केले आहे. टेंभू योजनेतून 44 गावांना अडीच टीएमसी पाणी देतोय. त्याचा शब्द 2019 मध्ये दिला होता. अडीच वर्षे बेइमानांचे सरकार नसते, देशमुखांसारखे पाणी अडवणारे लोक नसते तर हे पाणी अगोदरच आले असते. देवेंद्र फडणवीस यांनी माणमध्ये येऊन जनतेला जे जे शब्द दिले ते ते आम्ही पूर्णत्वाला नेत आहोत, असे गोरे यांनी म्हटले.
ऐऱ्यागैऱ्याच्या फेकाफेकीला कवडीचीही किंमत देत नाही : गोरे
मी सुरुवातीपासून दुष्काळ हटविण्यासाठी कार्यरत आहे. प्रत्येक निवडणुकीत विविध योजनांचे पाणी आणण्याचे ठेवलेले उद्दिष्ट पूर्ण करत आलो. जनतेला दाखवलेले स्वप्न आणि दिलेला शब्द पूर्ण करत पुढे चाललो आहे. जनतेचा आशीर्वाद असल्यामुळे ऐऱ्यागैऱ्याच्या फेकाफेकीला कवडीचीही किंमत देत नसल्याचे आ. गोरे म्हणाले.