सातारा प्रतिनिधी | कोरोना काळात 200 मृत रुग्णांना जिवंत दाखवून आमदार जयकुमार गोरे यांनी कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप मायणी येथील दीपक आप्पासाहेब देशमुख यांनी केला आहे. याबाबत त्यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर येत्या 5 जूलैला उच्च न्यायालयात त्यावर सुनावणी होणार आहे. आमदार जयकुमार गोरेंसह त्यांच्या पत्नी सोनिया गोरे आणि इतर संशयितांविरुद्ध तातडीने गुन्हे दाखल करून चौकशी करावी, अशी मागणीही याचिकेत करण्यात आली आहे.
आ. गोरेंचा भ्रष्टाचार उघड होऊनही कारवाई नाही
मायणी मेडिकल कॉलेजच्या विकासासाठी काढलेली कर्जे भागविण्यासाठी आमदार गोरेंना मेडिकल कॉलेजची भागीदारी देण्यात आली. मात्र, त्यांनी एक रुपयाचेही कर्ज भागविले नाही. उलट दुष्काळी भागात शून्यातून मेडिकल कॉलेज उभारणाऱ्या एम. आर. देशमुखांवरच ईडीने कारवाई केली. वास्तविक, कोरोना काळात आ. गोरेंनी केलेला लाखो रुपयांचा भ्रष्टाचार उघड होऊनही त्यांच्यावर कसलीही कारवाई झाली नाही, असा आरोप दीपक देशमुख यांनी यापूर्वी केला होता.
संस्थेच्या तत्कालीन अध्यक्षांना ईडीने केली होती अटक
मायणी मेडिकल कॉलेजमध्ये सन २०१२-१३, १३-१४ व १४-१५ या तीन वर्षांतील एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश न्यायालयाने अनियमित ठरवून २० कोटी रुपयांचा दंड ठोठावला. तो दंड संस्थेकडून वसूल करण्याचे आदेशही शासनास दिले होते. तसेच मेडिकल कॉलेजमध्ये खोटी यंत्रसामुग्री खरेदी दाखवून मनी लाँड्रिंग आणि बेकायदेशीर मार्गाने विद्यार्थ्यांकडून मेडिकलच्या अॅडमिशनसाठी भरमसाठ पैसे घेतल्याप्रकरणी ईडीने तत्कालीन चेअरमन एम. आर. देशमुख यांना १० मे २०२२ रोजी अटक केली होती.