कराड प्रतिनिधी । पुणे स्वारगेट बस स्थानकात उभ्या असलेल्या एका शिवशाही बसमध्ये फलटणला निघालेल्या एका 26 वर्षीय तरुणीवर एकाने अत्याचार केल्याची घटना बुधवारी घडली. दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज शुक्रवारी कराड दक्षिणचे भाजप आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी कराड बसस्थानकात येऊन येईल गैरसोयीची पाहणी केली. तसेच या ठिकाणी निर्माण झालेल्या गैरसोयींबाबत एसटी प्रशासनासह अधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना केल्या. कराड एसटी बसस्थानकातील अनेक समस्यांबाबत माहिती घेतली असून बसस्थानकातील गैरसोयींबाबत कठोर पावले उचलणे गरजेचे असल्याचे आमदार भोसले यांनी म्हटले.
आमदार डॉ.अतुलबाबा भोसले यांनी जेव्हा अधिकाऱ्यांसमवेत कराड एसटी बसस्थानकास भेट दिली. त्यावेळी प्रांताधिकारी म्हेत्रे, आगार व्यवस्थापिका शर्मिष्ठा पोळ, कराड तहसीलदार कल्पना ढवळे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी आमदार भोसले यांनी बसस्थानकाची पाहणी केली त्यानंतर बसस्थानकातील कर्मचाऱ्यांशी संवाद साधत समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर माध्यमांशी देखील त्यांनी संवाद साधला.
यावेळी आ. अतुलबाबा भोसले म्हणाले की, कराड बस्थानकात असणाऱ्या प्रवाशी, स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची गैरसोय, मोडकळीस पडलेल्या खुर्च्या आदींबाबत आज अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन यावर ठोस असा मार्ग काढून आराखडा होणे आवश्यक आहे. सर्व प्रथम या ठिकाणी सीएसआर फंडच्या माध्यमातून प्रवाशांना स्वच्छ पाणी पिता यावे यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.
अत्यंत दर्जेदार स्वरूपाचे महाराष्ट्रातील नंबर वनचे कराड बसस्थानक आहे. या बसस्थानकाचे जतन करणे आवश्यक आहे. याठिकाणी असणाऱ्या गैरसोयी दूर करण्याच्या अनुषंगाने आम्ही प्रयत्न करणार आहोत. याठिकाणी पोलिसांना कायम स्वरूपाची बसण्यासाठी पोलीस चौकी असावी यादृष्टीने आम्ही प्रयत्न करू त्याचप्रमाणे पुणे येथे घडलेल्या घटना या ठिकाणी घडू नये तसेच चोरी, छेडछाडीच्या घटना देखील घडू नये यासाठी कठोर उपाय योजना करण्यात याव्यात, अशा सूचना देखील अधिकाऱ्यांसोबत घेणाऱ्या आढावा बैठकीत करणार असल्याचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी सांगितले.