कराड प्रतिनिधी | कराड येथील झोपडपट्टी मधून अकरा वर्षे वयाची मुलगी शनिवारी संध्याकाळी अचानक घरातून निघून गेली होती. त्या मुलीचा तळबीड पोलिसांकडून तातडीने शोध घेण्यात आला. रविवारी संध्याकाळी सात वाजता सदर मुलीला आई-वडिलांकडे सुखरूप पोहोच करण्यात आले. तळबीड पोलिसांच्या कामगिरीचे जिल्हा पोलिस प्रमुख समीर शेख व कराड उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल ठाकूर यांनी कौतुक केले आहे.
वहागाव येथील झोपडपट्टीत शालन संजय फुलारी या आपले पती, दोन मुली व दोन मुलासह राहत आहेत. वाळवा या ठिकाणी मजुरीने काम करतात. शनिवार दि. 14 सप्टेंबर रोजी चारही मुले वहागाव येथे झोपडपट्टीतच ठेवून ते कामावर गेले होते. रात्री आठ वाजले तरी अकरा वर्षाची मुलगी घरी न आल्याने तिच्या थोरल्या बहिणीस आई-वडिलांनी विचारले. त्यावेळी ही मुलगी सायंकाळी पाचपासून आम्हाला दिसली नाही, असे तिने सांगितले. आई-वडिलांनी शनिवारी रात्रभर शोध घेतल्यानंतर रविवारी सकाळी तळबीड पोलिस ठाण्यास माहिती दिली.
दरम्यान घटनेची गांभिर्य ओळखून तळबीड पोलिस ठाण्याचे स.पो.नि. किरण भोसले यांनी तात्काळ वहागाव येथील झोपडपट्टी धाव घेतली. त्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्याच्या वेगवेगळ्या टीम तयार केल्या. पोलिसांनी संपूर्ण वहागाव परिसर पिंजून काढला. श्वानपथक पाचारण करण्यात आले. श्वान पथकाने झोपडपट्टीच्या पश्चिम बाजू असल्या डोंगर परिसरात मार्ग दाखवला. त्या अनुषंगाने किरण भोसले व त्यांच्या सहकार्यांनी तपासाची दिशा बदलत सर्व डोंगर परिसरात शोध घेतला. यावेळी ड्रोन कॅमेराचा वापर करून त्या बेपत्ता मुलीचा शोध घेण्यात आला.
दरम्यान किरण भोसले यांनी परिसरातील सर्व पोलिस पाटील यांना घटनेची माहिती दिली. दरम्यान वहागावच्या पश्चिमेला असलेल्या डोंगराच्या शेजारी अभयचीवाडी गावाजवळ ऊसतोड मजुराला सदर मुलगी दिसली. त्यांनी तात्काळ गावातील पोलिस पाटील कमलाकर कोळी यांना माहिती दिली. त्यांनी सदर मुलगी अभयचीवाडी येथे आहे असे कराड ग्रामीण पोलिसांना कळविले. तळबीड पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन खातर जमा केली असता वहागाव येथील घरातून बेपत्ता झालेली ही मुलगी असल्याचे निष्पन्न झाले. सदर मुलीस आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात आले. यावेळी पोलिस उपाधीक्षक अमोल ठाकूर, स.पो.नि.किरण भोसले यांनी कमलाकर कोळी यांचा सत्कार केला.