वाई तालुक्यात दीड लाखाच्या धान्याचा अपहार; काळ्या बाजारात धान्यविक्री प्रकरणी रेशन दुकानदारावर गुन्हा

0
960
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । रेशन दुकानदाराने लाभार्थ्यांच्या हक्काचे १ लाख ४१ हजारांचे धान्य काळ्या बाजारात विकल्याचा धक्कादायक प्रकार सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील खानापूर येथे घडला आहे. याप्रकरणी वाई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून राजेंद्र सुभेदार जाधव (वय ५२, रा. खानापूर) असे त्याचे नाव आहे.

याप्रकरणी वाई तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार समीर बेग, महम्मद बेग मिर्झा यांनी वाई पोलिसांत फिर्याद दिली असून त्यांनी यामध्ये म्हटले आहे की, दि. १६ रोजी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास खानापूर गावच्या हद्दीत स्वस्त धान्य दुकानदार राजेंद्र सुभेदार जाधव यांच्याकडून रेशन धान्याचा अपहार करत असल्याची माहिती बैग यांना मिळाली. यामुळे त्यांनी दुकानावर जाऊन मालाची तपासणी केली तसेच रजिस्टर देखील तपासले. यावेळी रजिस्टरमधील नोंदीप्रमाणे रेशनिंग दुकानदाराकडे दि. १६ पर्यंत एकूण गहू १ हजार ४५ किलो शिल्लक असणे गरजेचे होते; परंतु ३९५ किलो गहू कमी आढळून आला, तसेच एकूण ७१४ किलो वजनाचे तांदूळ शिल्लक आवश्यक असताना ३२८ किलो तांदूळ जास्तीचे दिसून आले.

शासकीय नोंदीनुसार २ किलो साखरही शिल्लक नव्हती. तसेच जाधव यांच्या दुकानाशेजारील घरात अंदाजे ५० किलोची ५० पोती गव्हाची व ५० किलोची ५ तांदळाची पोती जास्तीची मिळून आली. दुकानाशेजारील बोळामध्ये २५ किलो तांदूळ व १५ किलो गहू शासकीय बारदानात मिळून आले. राजेंद्र जाधव यांच्या रास्त भाव दुकानात अनियमितता दिसल्याने समीर बेग यांनी १ लाख ४१ हजार २२० रुपयांच्या धान्याच्या अपहारप्रकरणी पोलिसांत तक्रार दिली.

दरम्यान, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी भारतकुमार तुंबडे यांनीही गतवर्षी सातारा तालुकयातील वर्णे येथील विकास सोसायटीच्या रेशन दुकानाचे रजिस्टर तपासणी करून २ लाख ७३ हजार ४०० रुपयांच्या धान्याचा अपहार केल्या प्रकरणी फिर्याद दिली होती.