कराड प्रतिनिधी । अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी युवकाला दोषी धरून न्यायालयाने 20 वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच 2 लाख 60 हजार रुपये दंड ठोठावला असून, अतिरिक्त जिल्हा व सत्र न्या. के. एस. होरे यांनी ही शिक्षा सुनावली आहे.
संगम संभाजी डुबल (वय 28, रा. राजमाची-सदाशिवगड, ता. कराड) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. याबाबत सरकार पक्षाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलीची सोशल मीडियावर संगम डुबल याच्याशी जानेवारी 2022 मध्ये ओळख झाली. त्यानंतर त्यांच्यामध्ये मैत्री झाली. संगम तिला भेटायला जात होता. तिला विजयनगर येथील एका लॉजवर घेऊन गेला. तिथे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत मुलीवर अत्याचार केला. त्यानंतर वारंवार ब्लॅकमेल करून शिवीगाळ करीत त्या मुलीवर त्याने अत्याचार केला. अखेर मुलीने याची माहिती कुटुंबियांना दिल्यानंतर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक एस. आर. पवार आणि हवालदार व्ही. ए. संदे यांनी या गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. जिल्हा सरकारी वकील आर. सी. शहा यांनी सरकार पक्षाकडून यांनी केलेला युक्तिवाद, साक्षीदारांच्या साक्ष आणि सादर केलेले पुरावे ग्राह्य मानून शिक्षा सुनावण्यात आली आहे. सरकार पक्षाला पोलीस हवालदार एस. बी. भोसले यांनी सहकार्य केले.