सातारा प्रतिनिधी । सर्वत्र काल पत्रकार दिवस साजरा करण्यात आला. साताऱ्यात आयोजित पत्रकार दिनाच्या कार्यक्रमास राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी “सातारा शहराची नुकतीच हद्दवाढ झाली असून भविष्यात सातारची महानगरपालिका करुन सातारकरांना अधिक सुविधा दिल्या जातील. सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून सातार्याला तब्बल 30 वर्षांनी संधी मिळालेली आहे. मी एकटाच नाही तर आपण सर्व मंत्री आहात. या संधीचे सोने करताना फक्त सातारा तालुकाच नाही तर जिल्हाभरातील रस्त्यांचा विकास करणार आहे. सातार्यातील पोवईनाक्यावर छत्रपती शिवरायांचा 25 फुटी पुतळा उभारणार असल्याची ग्वाही मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली.
मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी काल माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, सातार्याचा विकास साधायचा झाल्यास येत्या 5 वर्षांत सातारा नगरपालिकेची महापालिका करावी लागणार आहे. बेळगाव येथे खाऊगल्ली नेटकी उभारण्यात आली आहे. सातारा पालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी ती अवश्य पहावी. त्या पार्श्वभूमीवर सातारा शहरात अनेक कृतीशील प्रयोग करता येतील. बांधकाम मंत्री म्हणून भाजप पक्षाने मोठी जबाबदारी दिली आहे. तसे हे खाते बदनाम देखील आहे.
मात्र, आपण कार्यभार स्वीकारल्याने सार्वजनिक बांधकाम खात्याच्या माध्यमातून पारदर्शकपणे अधिक विकास करता येईल तेवढा निश्चित करणार आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून मला मिळालेल्या संधीचे सोने करताना फक्त सातारा व जावली तालुकाच नाही तर जिल्ह्याच्या रस्ते विकासात मी योगदान देईन. सातारा ही ऐतिहासिक नगरी असून शहरासह परिसरातील रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. अदालत वाडा ते बोगदा परिसरातील वाहतूक कोंडी टाळण्याासाठी उड्डाणपूल करण्यासाठी सर्व्हे करण्यास सांगितले आहे. त्यामुळे बोगद्यकडे जाणारे वाहतूक कोंडी कमी होणार आहे. स्मार्ट सिटी संकल्पनेत सातारा नगर परिषद येत नसल्याने विकास करताना काही मर्यादा येत आहेत.
सातार्यातील पोवईनाक्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या परिसराचे सुशोभिकरण झाले आहे. सुशोभिकरण अत्यंत चांगले झाले आहे. मात्र, तेथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा यात झाकोळून गेल्यासारखा वाटत असल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यामुळे आताच्या पुतळ्याच्या जागेवर तसाच तोफेवर हात ठेवून उभ्या असलेल्या शिवाजी महाराजांचा 25 फूट उंच दिमाखदार पुतळा बसवण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव सातारा पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्याकडे आहे. लवकरच हे काम होणार असल्याचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी म्हटले.