शिवतीर्थावर लोकनेते बाळासाहेब देसाई नावाने आयलँड तयार करणार :पालकमंत्री शंभूराज देसाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सातारा शहरात सध्या ज्या मुद्यांवरून वाद पेटलेला आहे त्या शिवतीर्थासंदर्भात चर्चा करण्यासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आज साताऱ्यात बैठक घेतली. या बैठकीत ते नेमकं काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर मंत्री शंभूराजेंनी शिवतिर्थाबाबत व परिसरातील कामाबाबत महत्वाचे विधान केले. शिवतीर्थाला कोणत्याही प्रकारचा धक्का लावू नये. तसेच या ठिकाणी पूर्वी परंतु आता काढून टालेल्या आयलँडच्या ठिकाणी लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या नावे नव्याने आयलँड तयार करण्यात येणार आहे, असे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले.

पोवईनाका परिसरात लोकनेते बाळासाहेब देसाई आयलँड सुशोभीकरण करण्याबाबत आज नियोजन भवनात मंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, युनायटेड वेस्टर्न बँकेचे पूर्वी एक आयलँड होते. हे आयलँड ग्रेड सेपरेटच्या कामांमध्ये काढून टाकण्यात आले आहे. त्याठिकाणी लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या नावाने आयलँड तयार करण्यात येणार आहे. यामध्ये बगीचा यासह अत्याधुनिक पद्धतीचा वापर करून आयलँड तयार करण्यात येणार आहे. याबाबत राजघराण्याची काय शंका असल्यास त्यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा केली जाईल,असेही पालकमंत्री देसाई यांनी सांगितले.

आज पार पडलेल्या महत्वाच्या बैठकीस जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख, नगरपालिका मुख्याधिकारी अभिजीत बापट तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.