कराड प्रतिनिधी । शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत वापरलेल्या ‘कलंक’ या शब्दावरून महाराष्ट्राच्या राजकारणात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. यावर आता शिंदे गटाचे नेते तथा पालकमंत्री शंभूराज देसाईंनी प्रतिक्रिया दिली आहे. “उद्धव ठाकरे संयमी नेते आहेत. मात्र, संजय राऊत जवळ असल्याने त्यांच्या सवयीचा परिणाम ठाकरेंवर बहुदा झाला असावा. त्यातूनच ठाकरे देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत बोलले असावेत. आता ॲक्शनला रिॲक्शन येत आहे. जनतेतून यावर तीव्र संताप उमटत आहेत. असा शब्द वापरल्याने ॲक्शनला रिॲक्शन येणारच, असे मंत्री देसाईंनी म्हंटले आहे.
मंत्री शंभूराज देसाईंनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ठाकरेंकडून फडणवीसांबाबत वापरल्या गेलेल्या शब्दावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, उद्धव ठाकरेंचे यापूर्वीचे भाषण आम्ही ऐकलेले आहे. एक संयमी आणि शांत वक्तृत्व उद्धव साहेबांचे असायचे. परंतु गेल्या वर्ष भरात आम्ही जी भूमिका एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली स्वीकारली. तेव्हापासून आता महिना-दोन महिन्यामध्ये उद्धव साहेबांच्या वक्तव्यामध्ये एक वेगळेपणा दिसतोय. याचा कारण म्हणजे संजय राऊतच सतत उद्धव ठाकरे यांच्या जवळ आहे. सवयीचा परिणाम जसा आपण म्हणतो तस राऊत जी भाषा बोलतात, जे शब्द वापरतात. ते शब्द उद्धव साहेबांच्या कानावर पडत असल्यामुळे कदाचित त्यांच्याकडून फडणवीस यांच्याबद्दल एक शब्द गेला. तो कुणालाच खोचलेला नाही.
ठाकरेंकडून फडणवीसांबाबत उच्चारलेल्या ‘त्या’ शब्दाबाबत मंत्री शंभूराजे देसाईंची प्रतिक्रिया pic.twitter.com/5TsX01Qsrg
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) July 12, 2023
महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्रेम करणारे लाखो त्यांचे चाहते आहेत. जे व्यक्तिमत्व राज्याला पुढे घेऊन जाणारे आहे. फडणवीस हे उत्कृष्ट संसद पट्टू आहेत. अशा एका अभ्यासू आणि अनुभवी राज्याला पुढे घेऊन जाणाऱ्या नेतृत्वाबाबत कलंकित हा शब्द प्रयोग उद्धव ठाकरे यांच्याकडून होणे हे महाराष्ट्रातील कुणालाच रुचलेले नाही. ॲक्शनला रिॲक्शन जस आपण म्हणतो जसे उद्धव ठाकरे यांच्याकडून फडणवीसांबाबत हा शब्द आल्यामुळे कदाचित लोकांमधून त्यांच्या विरुद्ध भावना उठायला लागल्या आहेत, त्याचा निषेध व्हायला लागला आहे.
त्यामुळे असे वक्तव्य राज्याच्या नेतृत्व करणाऱ्याबद्दल करणे उद्धव ठाकरे यांनी टाळायला हवे.सोमवारपासून मंत्रिमंडळाचे तीन आठवड्यांचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री लवकरच विस्तार व खाते वाटप करतील. मंत्रिमंडळ विस्तार व खाते वाटप पावसाळी अधिवेशनापूर्वी होईल, असे वाटते. साताऱ्याचे पालकमंत्री पद राष्ट्रवादी आणि अजित पवारांना देण्याबाबत जो निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतील तो आम्हाला मान्य असेल, असे मंत्री देसाई यांनी म्हंटले.